अतुल जाधव
देवराष्ट्रे: कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा नवनवीन पिके घेण्याकडे कल वाढला आहे त्यातच पैसा देणारा पिकाची शेतकरी निवड करू लागला आहे यावर्षी आले पिकाने अनेकांना लखपती कोट्यधीश बनविले आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यात आले क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये कडेगाव तालुका आले पीक लागवडीत 'नंबर वन' आहे कडेगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळ्या पिकासाठी उत्तम दर्जाची आहे. कसदार व निचऱ्याची जमीन प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
त्यामुळे या जमिनीमध्ये आले, हळद व भाजीपाला ही पिके चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न देऊन जात आहेत. गतवर्षी कडेगाव तालुक्यातील २०० ते ३०० हेक्टरवर आले लागवड केली होती. मात्र, या आल्याने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना लखपती व कोट्यधीश बनविले आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले लागवड करण्याचा निर्णय घेतला. कडेगाव तालुक्यातील वांगी, खेरडी वांगी, उपाळे, सोहोली तोंडोली, देवराष्ट्रे, चिंचणी सर्व तालुक्यांत लहान-मोठ्या हजारो शेतकऱ्यांनी आले लागवड केली आहे.
आले बियाणे दर ९० चे १०० रुपये किलो दराने घेऊन शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे अतिशय खर्चिक असणाऱ्या आले पिकाकडे यावर्षी शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
कडेगाव तालुक्यामध्ये सध्या नऊ हजार एकर क्षेत्रावर फक्त आले पिकाची लागवड झाली आहे. या आले पिकाची लागवड ९९ टक्के शेतकऱ्यांनी बेड पद्धतीने केले आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादन देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची स्पर्धा चालू आहे.
आले लागवडीत पुढे
यापूर्वी कायम सातारा जिल्हा आले लागवडीसाठी अग्रेसर राहायचा. मात्र, कडेगाव तालुक्यांनी यावर्षी सातारा, कोल्हापूर, सांगली या तिन्ही जिल्ह्यांतील आले क्षेत्राला मागे टाकत आले लागवडीमध्ये सर्वांत पुढे आहे, अशी माहिती कडेगाव तालुका कृषी अधिकारी भोनेश्वर गोडके यांनी दिली.
अधिक वाचा: Shetkari Yojana शेतकऱ्यांनो.. ह्या योजनांसाठी करा अर्ज मिळेल अडीच लाखांपर्यंतचे अनुदान