फुलंब्री तालुक्यात खरिपाच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत पूर्ण झाली असून यंदा ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी कपाशीची विविध कंपनीची बियाण्यांची पाकिटे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली.
फुलंब्री तालुक्यात खरिपाचे ५७ हजार १२२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रावर शेतकऱ्यानी मशागतीचे कामे पूर्ण केली असून नांगरणी केल्यानंतर शेणखत टाकून रोटावेटरने जमीन भुसभुशीत करून ठेवली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या माधमातून शेतीची मशागत केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेती आहे त्या शेतकरी बैलांच्या माध्यामातन शेतीची मशागत केली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात यंदा शेतकरी कपाशीची लागवड करण्यास प्राधान्य देणार असून त्यानंतर मक्याची लागवड होणार आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना रीतसर पावती घेऊन त्या पावती सोबत बियाण्याची रिकामी झालेली पिशवी जतन करून ठेवावी व बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. तसेच कोणत्याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ठराविक वाणाचा आग्रह करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी केले आहे.
२० हजार मे. टन खतसाठा मंजूर
* दरम्यान, तालुक्यासाठी २३ हजार ३९ मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी होती. त्यानुसार २० हजार ७६८ मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे.
* त्यात युरिया ७ हजार १९४ मेट्रिक टन, डीएपी १ हजार ८१३ मेट्रिक टन, एमओपी ३८१ मेट्रिक टन, एसएसपी २ हजार ९४२, कॉम्प्लेक्स ८ हजार ४३८ मेट्रिक टन खताचा समावेश आहे.