Join us

लसूण लावताय, अधिक उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 3:31 PM

कृषी संशोधन केंद्रांत तसेच कृषी विद्यापीठांत अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून निर्माण केलेले अणि शिफारस केलेल्या काही महत्वाच्या जाती आहेत.

लसणामध्ये अनेक स्थानिक वाण प्रचलित आहेत. जामनगर, महाबळेश्वर अशा स्थानिक नावाने ओळखले जाणारे वाण, तसेच गुजरात, मध्यप्रदेशात लाडवा व मलिक तर कर्नाटकात फावरी व राजेळी गड्डी या नावाने जाती प्रचलित आहेत. कृषी संशोधन केंद्रांत तसेच कृषी विद्यापीठांत अनेक वाण गोळा करून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम चालू आहे. संशोधनातून निर्माण केलेले अणि शिफारस केलेल्या काही महत्वाच्या जाती आहेत.

लसणाचे सुधारित वाणभीमा ओमकारलसणाची ही जात कांदा व लसूण संशोधन संचालनालयाद्वारे विकसित केली असून अधिक उत्पादनक्षम आहे. प्रत्येक कांद्यामध्ये १८ ते २० पाकळ्या असतात. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ४१.२ टक्क्यांपर्यंत असते. विविध क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर केलेल्या उत्पादनाच्या पाहणीनुसार उत्पादनाचे प्रमाण ८० ते १४० किंटल प्रती हेक्टर पर्यंत असते. सरासरी उत्पादन १०७.६ किंटल प्रती हेक्टर एवढे असते. पानांच्या रोगांना प्रतिकारक्षम आहे.

भीमा पर्पललसणाची ही जात कांदा व लसूण संशोधन संचालनालयाद्वारे विकसित केली असून अधिकतम उत्पादन आणि चांगली प्रत यासाठी प्रसिद्ध आहे. मध्यम आकाराचा एकसंध जांभळट रंग असणारा, १६ ते २० कळ्या/पाकळ्या असणारा कंद (बल्ब) असतो. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ३३.६ टके आणि अॅलिसिन (ताज्या वजनाच्या) प्रमाणे २.५ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम तसेच सुकवलेल्या वजनाच्या प्रमाणे ९६ मि.ग्रॅ. प्रती ग्रॅम प्रमाणे असते सरासरी उत्पादन ६ ते ७ टन प्रती हेक्टर एवढे असते.

गोदावरीही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित करण्यात आलेली आहे. गड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळा-पांढरा, स्वाद-तिखट, प्रत्येक गड्ड्यात सरासरी २४ पाकळ्या असतात. गड्डा मध्यम जाडीचा असून जाडी ४.३५ सेंमी व उंची ४.३ सें.मी. आहे. या जातीचा कालावधी १४० ते १४५ दिवसांचा आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न १०० ते १५० क्विटल मिळते. या जातीत रोग व किडींचे प्रमाण कमी असून ही जात साठवणीस योग्य आहे.

श्वेताही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केली आहे. या जातीचा गड्डा मोठा असून जाडी ५.२ सेंमी व उंची ५ सेंमी आहे. रंग पांढरा शुभ्र, स्वाद तिखट आणि एका लसणाच्या गाठीत सुमारे २६ पाकळ्या असतात. या जातीचा कालावधी १३० ते १३५ दिवसांचा आहे. या जातीपासून हेक्टरी सरासरी १०० ते १३० किंटल उत्पन्न येते.

फुले निलिमाही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केलेली आहे. या जातीचा गड्डा आकाराने मोठा, आकर्षक, जांभळ्या रंगाचा असून ही जात जांभळा करपा, फुलकिडे, कोळी या रोग व किडीस मध्यम प्रतिकारक्षम आहे.

फुले बसवंतहा लसणाचा सुधारित वाण म.फु.कृ.वि. राहुरी अंतर्गत कांदा संशोधन योजना, पिंपळगाव बसवंत येथून निवड पध्दतीने विकसीत करण्यात आला आहे. या वाणाच्या गड्ड्यांचा रंग जांभळा असून पाकळ्यासुध्दा जांभळ्या रंगाच्या आहेत. सर्वसाधारण एका गड्ड्यात २५ ते ३० पाकळ्या असून सरासरी गड्ड्याचे वजन ३०-३५ ग्रॅम आहे. सरासरी उत्पन्न १४० ते १५० क्विंटल आहे.

अंग्री फाउंड व्हाईटही जात एन. एच. आर. डी. एफ नाशिक येथून प्रसारित करण्यात आली आहे. ही जात पांढरे गड्डे असणारी, स्वाद मध्यम तिखट, गड्डा आकाराने मोठा, घट्ट, जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. पाकळ्यांची संख्या १३ ते १८ च्या दरम्यान असते. ही जात लागवडीपासून १२०-१३५ दिवसात काढणीस तयार होते. हया जातीपासून हेक्टरी सरासरी उत्पादन १३० ते १४० क्विंटल मिळते. हया जातीत रोग व किडींचे प्रमाण कमी असून ही जात साठवणीस योग्य आहे.

यमुना सफेदही जात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक (एन. एच. आर. डी. एफ) या संस्थेने विकसीत केलेली आहे. या जातीचा गड्डा आकाराने मोठा, जाडी ५.६ सेंमी, उंची ५.५ ते ६ सेंमी, गड्डा घट्ट, पांढरा, पाकळ्यांची संख्या १५-१६ असून त्या जाड असतात ही जात भारतात सर्वत्र लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न १५०-१७५ क्विंटल मिळते. ही जात साठवणीस मध्यम व निर्यातीस योग्य आहे.

जी-२८२ही जात एन. एच. आर. डी. एफ नाशिक येथून प्रसारित करण्यात आली आहे. या जातीच्या गाठी पांढऱ्या रंगाचे असून मोठया आकाराचे, गड्ड्यामध्ये १५ ते १६ पाकळ्या असतात. या जातीपासून १७५ ते २०० क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते. तसेच निर्यातीसाठी उपयुक्त आहे.

यमुना सफेद-१ही जात एन. एच. आर. डी. एफ येथून प्रसारित करण्यात आली आहे. या जातीच्या गाठी पांढऱ्या रंगाचे असून सरासरी उत्पन्न १५० ते १७५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

यमुना सफेद-२ (जी-५०)या जातीचे गड्डे आकर्षक पांढरे, प्रति गड्डा ३५-४० पाकळ्या असतात. या जातीचे सरासरी उत्पन्न १५० ते २०० क्विंटल मिळते.

डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. प्रांजली गेडाम, डॉ. विजय महाजनकांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे

टॅग्स :पीकशेतकरीशेतीरब्बी