राजरत्न सिरसाटअकाेला : पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आता कमी पाण्यात व कमी खर्चात येणारे बियाणे विकसित करावी लागणार आहे. सध्या धान पिकाला लागणारे पाणी बघता अकाेल्याच्या डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने साकाेली व सिंदेवाही येथील धान संशाेधन केंद्रावर गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाद्वारे धान लागवडीचा प्रयत्न केला हाेता. परंतु यात सातत्य आणि आणखी प्रयत्नाची गरज असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
राज्यात १५.५० लाख हेक्टरवर धान पीक लागवड केली जात असून, यातील ५२ टक्के भाताचे क्षेत्र हे विदर्भात आहे. गतवर्षी विदर्भात ८ ५० लाख हेक्टरवर धान (तांदूळ) लागवड करण्यात आली हाेती. सध्या एक किलाे तांदूळ उत्पादनासाठी पाच हजार लिटरवर पाण्याची आवश्यकता आहे तर उत्तम व भरघाेस उत्पादनासाठी विदर्भात तरी एकूण ११०० ते १२०० मि.मी. पावसाची गरज आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षात पावसाच्या अनिश्चतेतेच्या पार्श्वभूमीवर मातीच्या गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाद्वारे धान लागवडीचा प्रयाेग करण्यात येत आहे परंतु आता जे धानाचे वाण उपलब्ध आहेत. त्याला भरपूर पाण्याची गरज आहे यामुळे ठिबक सिंचनावर येणारे वाण कृषी विद्यापीठांना विकसित करावे लागणार आहे.
साकाेली-१०-१५-७० भाताचे नवे वाण विकसितलाल तांदळानंतर डाॅ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने साकाेली-१०-१५-७० भाताचे नवे वाण विकसित केले आहे. हे वाण सध्या पूर्व प्रसारित असून, राज्यस्तरीय चाचणी प्रयाेगामध्ये या वाणाचे प्रादेशिक तुल्यवाण साकाेली-६ आणि राज्यस्तरीय तुल्यवाण केजीटी-७ पेक्षा अनुक्रमे ३१.३० टक्के आणि २६.१९ टक्के अधिक उत्पादन मिळाले आहे. तर विद्यापीठ बहुस्थळीय चाचणी प्रयाेगात साकाेली-६ पेक्षा ११.२६ टक्के अधिक उत्पादन नाेंदिवण्यात आले आहे.
खाण्यास उत्तम तांदूळ हा तांदूळ खाण्यात उत्तम असून, मिलिंग उतारा ७१.२२ टक्के आहे. तर संपूर्ण तांंदळाचा उतारा हा ६३.९९ टक्के आहे. मध्यम अमायलाेज २३.५५ टक्के तर मऊ जीसी ७७ मि.मी आहे. १२१ दिवस, ठेंगणा ९५ से मी व लांब बारीक दाण्याचा आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात भात संशाेधक डाॅ. जी. आर. श्यामकुवर हे काम करीत आहेत.
गादी वाफ्यावर ठिबकने पाणी देऊन धान लागवड केल्यास पाण्याची बचत हाेऊन भरघाेस उत्पादन मिळते,यासाठीचा प्रयाेग यशस्वी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पध्दतीने शेती करणे गरजेचे आहे - डाॅ. बी.डी. जडे, कृषी शास्त्रज्ञ