जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी शासनही विविध उपाययोजना करीत आहेत. परंतु, यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्यामुळे विहिरी, बोअरवेलची पाणी पातळीही खालावली आहे. परंतु, भविष्यातील शेतीचा खर्च भागवण्यासाठी विहिरीतील असलेल्या पाण्यावरच शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून भर उन्हात ठिंबक सिंचनवर मिरचीची लागवड सुरू केली आहे.
तालुक्यात मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक शेतकरी एका एकरात मिरची लागवड करतो. गेल्या वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला असल्याने यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी मिरची लागवडीकडे मोर्चा वळवला आहे.
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही काही शेतकऱ्यांनी शेततळ्यात मिरची लागवडीसाठी पाणी साठवून ठेवले आहे, तर पारध, वालसावंगी, शेलूद, हिसोडा, बोरगाव जहाँगीर, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, अवघडराव सावंगी, पद्मावती आदी परिसरात एप्रिल महिन्यातच मिरची लागवडीला सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यांत मिरचीची लागवड करून उत्पादन घेतले. त्यांना चांगलेच मालामाल केले. त्यामुळे यंदाही दुष्काळी परिस्थितीही शेतकरी मिरची लागवड करीत आहेत. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरचीची लागवड करतात. कारण, जूनमध्ये पावसाला सुरूवात होते. त्यानंतर ही मिरची पाण्याअभावी सुकून जात नाही. त्यामुळे अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात मिरचीची लागवड करण्यावर भर देतात. या लावलेल्या मिरचीच्या तोड्यांनाही भाव सापडल्यास शेतकऱ्यांचा खर्च निघतो.
शेतकरी बांधवानो कामाच्या नादात पाणी पिण्याचं विसरून जाताय! सावधान होईल मुतखडा
एकरसाठी ९२,५०० रुपयांचा खर्च
• भोकरदन येथील शेतकरी राजेंद्र सावळाराम जोशी मिरचीचे उत्पादन घेण्यावर आघाडीवर आहेत. यंदाही त्यांनी बोरगाव जहाँगीर येथील शेतात चार एकरमध्ये ५ एप्रिल रोजी मिरचीची लागवड केली आहे. त्यांनी एकरी १२ हजार मिरचीची रोपे १ रुपया ५० पैसेप्रमाणे स्वरेदी केले आहे. त्यासाठी लागवड करण्यापूर्वी शेतात मल्चिंग टाकले, ठिंबकही केले.
• शिवाय त्यासाठी स्पेशल डोस किट वापरली व सव्वा फूट बाय चार या अंतराने मिरची रोपांची लागवड केली. एका एकरसाठी सुमारे ९२,५०० रुपये, तर चार एकरांसाठी ३ लाख ७० हजार रुपये आतापर्यंत खर्च आला असल्याचे राजेंद्र जोशी यांनी सांगितले. जून महिन्यात आणखी ६ एकरांत मिरची लागवड करणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
३५० क्विंटल उत्पादन एका एकरात ३०० ते ३५० क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले आहे. एप्रिल व मे महिन्यांत ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली त्यांना चांगला भाव मिळतो. तीन ते चार तोड्याला जरी भाव मिळाला तरी मिरची इतर पिकांपेक्षा अधिक आर्थिक फायदा शेतकऱ्यांना करून देते. शेतात एकाच जातीची रोपे न लावता पिकडोर, आरमार, तलवार या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. - राजेंद्र जोशी, शेतकरी