Join us

'वाली' शेंगवर्गीय भाजी लागवड ठरत आहे फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 4:53 PM

शेंगवर्गीय भाज्यांची लागवड शक्यतो रब्बी हंगामात केली जाते. लाल मातीत वालीचे उत्पादन चांगले येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील हवामानात चांगले उत्पन्न मिळवून देणारी 'कोकण वाली' ही सुधारित जात विकसित केली असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

शेंगवर्गीय भाज्यांची लागवड शक्यतो रब्बी हंगामात केली जाते. लाल मातीत वालीचे उत्पादन चांगले येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील हवामानात चांगले उत्पन्न मिळवून देणारी 'कोकण वाली' ही सुधारित जात विकसित केली असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळून येते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन पिकाला चांगली मानवते. खरीप हंगामात जिराईत, रब्बी/उन्हाळी हंगामात बागायतीत पीक घेता येते. कोकणात भात कापणीनंतर त्या जमिनीत अन्य भाजीपाला पिकाप्रमाणे वालीचीही लागवड केली जाते.

जमिनीची चांगली नांगरणी करून हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून तीन बाय तीन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. त्यानंतर ६० सेंटीमीटर अंतरावर लहान खड्डे करून रासायनिक खतांचा पहिला हप्ता ३० किलो नत्र, ६० किलो स्फूरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावा. खते मातीत चांगली मिसळावीत. उरलेले ६० किलो नत्र, ६० ते ८५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा विभागून झाडाच्या सभोवती बांगडी पद्धतीने द्यावे. पेरणी ६० बाय ६० सेंटीमीटर अंतरावर २ ते ३ बिया टाकून करावी. लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावे. सुरुवातीच्या पाण्याच्या पाळ्या हलक्या द्याव्यात. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक हेक्टर लागवडीसाठी ८ ते १० किलो बियाणे लागते.

'कोकण वाली' ही जात दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. रब्बी हंगामात पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी शेंगाची तोडणी करता येते. शेंगाची लांबी ३५ ते ४० सेंटीमीटर असते. या जातीपासून हेक्टरी ६० ते ७० क्विंटल उत्पादन मिळते. बियांची उगवण झाल्यानंतर १५ ते २० दिवसांनी रोपांची विरळणी करावी. प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवावे. खुरपणी करून वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पिक संरक्षणलागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी १.५ मि. ली. डायमेथोएट एक लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक फुलोऱ्यात आल्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी मॅलॉथिऑन १ मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या आणि निळ्या चिकट कागदाच्या कार्डचा वापर करावा. ज्यामुळे मावा व फुलकिडीच्या प्रादुर्भावाला आळा बसेल. पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी शेंगाची तोडणी करता येते. वालीच्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगाची तोडणी करावी. तोडणी २ ते ३ दिवसांनी करावी. शेंगांना चांगला दर मिळतो.

टॅग्स :भाज्याशेतकरीशेतीकोकणविद्यापीठलागवड, मशागत