चीन नंतर भारतात लसणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात मध्यप्रदेश, गुजरात, ओरिसा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये अग्रेसर आहेत. महाराष्ट्रात सुमारे १२००० हेक्टर क्षेत्रावर लसूण लावला जातो. पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा हे लसूण पिकवणारे प्रमुख जिल्हे आहेत.
हवामान व लागवडीचा हंगाम
लसूण हे थंडीला प्रतिसाद देणारे पीक आहे. वाढीच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते. लागवडीनंतर सुरुवातीचे दोन महिने पानांची वाढ होते तेव्हा रात्रीचे तापमान १० ते १५ अंश से. व दिवसाचे तापमान २५ ते २८ अंश से. च्या दरम्यान लागते. तसेच हवेत ७० ते ८० टक्के आर्द्रता हवी व ११ ते १२ तास सूर्यप्रकाश हवा. यानंतर पाकळ्या पोसू लागतात व गड्डा आकाराने वाढू लागतो. हा कालावधी ३० ते ४० दिवसांचा असतो. या काळात रात्रीचे तापमान कमी आणि दिवसांच्या तापमानात वाढ हवी असते.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लसणाची लागवड करावी. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते. फेब्रुवारी, मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. हवेतील आद्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो एप्रिल महिन्यात आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. उशिरा लागवड झाली तर गड्ड्यांचा आकार कमी होतो, वजन कमी भरते व उत्पादन देखील कमी येते.
जमीन
लसूण जमिनीत पोसत असल्यामुळे गड्ड्याच्या वाढीकरिता जमीन भुसभुशीत आणि कसदार लागते. मुरमाड किंवा हलक्या जमिनीत गड्ड्याची वाढ कमी होते. मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्यांची चांगली वाढ होत नाही. तसेच पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी लसूण लागवडीसाठी टाळाव्यात.
सुधारित जाती: लसूण लावताय, अधिक उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल?
बियाणे प्रमाण
लसणाची लागवड पाकळ्या लावून करतात. शक्यतो सुधारित जातीचे बियाणे लागवडीसाठी वापरावे. गड्डे फोडून पाकळ्या वेगळ्या कराव्यात. एक हेक्टर लागवडीसाठी पाकळ्यांच्या आकारानुसार ४०० ते ६०० किलो पाकळ्या लागतात. मोठ्या, सारख्या आकाराच्या, निरोगी पाकळ्या (८ ते १० मि.मी लांब) निवडक कुड्या/पाकळ्या लागवडीसाठी वापराव्यात.
लागवड व लागवडीचे अंतर
लसणाची लागवड शक्यतो सपाट वाफ्यातच करावी. त्यासाठी जमिनीचा उतार पाहून ३ X २ मी. किंवा २४१ चौ.मी. चे वाफे करावेत. दोन ओळीतील अंतर १५ सेंमी व दोन कुड्यातील अंतर ७.५ ते १० सें.मी ठेवावे.
पूर्व मशागत व रान बांधणी
उन्हाळ्यात खोल नांगरट करून नंतर २ ते ३ कुलवाच्या पाळ्या घ्याव्यात. हरळ, लव्हाळाच्या गाठी किंवा पूर्व पिकाची धसकटे वेचून घ्यावीत. हेक्टरी १० ते १५ टन शेणखत शेवटच्या कुळवणीद्वारे जमिनीत मिसळून घ्यावे. लसणाची लागवड २५४ किंवा ३५४ मीटर अंतराच्या सपाट वाफ्यात केली जाते. अलीकडे ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर कांदा व लसून पिकात होत आहे. त्यासाठी १२० सें.मी. रुंदीचे, ४० ते ६० मीटर लांबीचे व १५ सेंमी उंचीचे गादी वाफे ट्रेक्टरला जोड़ता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत. ठिबक सिंचनासाठी एका गादीवाफ्यावर दोन ठिबकचे पाइप वापरावे.
लागवड
लसणाच्या पाकळ्या टोकन करुन लावाव्या लागतात. निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५ x १० सेंमी. अंतरावर व २ सेंमी खोलीवर लावाव्यात. साधारणपणे या अंतराने ६० झाडे प्रति चौरस मीटरला बसतात. पाकळ्या उभ्या लावल्यामुळे उगवण एकसारखी होते. सपाट वाफ्यात फार ढेकळे असतील तर हलके पाणी देऊन नंतर वाफयावर लागवड करावी. लगवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या बाविस्टिन व कार्बोसल्फान द्रावणात दोन तास बुडवून मग लागवड करावी. १० लीटर पाण्यात २० मिली कार्बोसल्फान व २५ ग्रॅम बाविस्टिन मिसळून द्रावण तयार करावे.
भरखते
महाराष्ट्रातील जमिनीसाठी १०० किलो नत्र, ५० किलो प्रत्येकी स्फुरद व पालाश यांची शिफारस केली आहे. ५० टक्के नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद यांची मात्रा पाकळ्यांची टोकन करण्यापूर्वी वाफ्यात द्यावी व नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यात विभागुन द्यावी. पहिली मात्रा लागवडी नंतर ३० दिवसांनी आणि दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी. नत्राची मात्रा लगवडीनंतर ६० दिवसानंतर देऊ नये. उशिरा दिलेल्या नत्राचा साठवणीवर विपरीत परिणाम होतो. तसेच अलीकडे कांदा व लसूण ही पीके गंधक युक्त खतास प्रतिसाद देतात असे लक्षात आले आहे. सुपर फॉस्फेट किंवा अमोनियम सल्फेट या खतांचा वापर केला तर आवश्यक तेवढ्या गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते. अन्यथा २५ किलो गंधक वेगळे देणे आवश्यक आहे. अलीकडे शेणखताचा वापर कमी होत असल्याने सूक्ष्मद्रव्यांची कमतरता जाणवू लागली आहे. ०.५% म्हणजे ५० ग्रॅम सूक्ष्म द्रव्य मिश्रणाची १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
तणनाशकाचा वापर
काही वेळा मजुरांचा तुटवडा असतो, त्यामुळे खुरपणी वेळेवर करणे शक्य होत नाही. अशावेळी तणनाशकाचा वापर करणे सोयीस्कर ठरते. लसणाची लागवड झाल्यानंतर २-३ दिवसांनी तणांचा प्रादुर्भाव भाव होऊ नये म्हणून गोल किंवा ऑक्झीगोल्ड (१-१.५ मिली प्रती लीटर पाण्यात) या तणनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे ३० ते ४५ दिवस शेत तणमुक्त राहण्यास मदत होते.
पाणी नियोजन
कांद्याप्रमाणे लसणाची मुळे जमिनीच्या वरच्या १० सेमी ते २० सेमीच्या थरात असतात. त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम असणे आवश्यक असते पाकळ्या कोरड्या लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे आंबवनी साधारणपणे ३ ते ४ दिवसांनी द्यावी. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात १० ते १२ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. साधारणपणे १२ ते १५ पाण्याच्या पाळ्या लागतात. ठिबक किंवा तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते, उत्पादन अधिक येते, पाण्याची बचत होते, तणांची व किडींचा उपद्रव कमी होतो.
काढणी, उत्पादन व हाताळणी
लसणाचे पीक साधारणपणे १२० ते १५० दिवसात काढणीस तयार होते. गड्डा पूर्ण भरल्यावर पातीची वाढ थांबून पात पिवळी पडते व माना पडू लागतात. पातीत बारीक गाठ तयार होते. याला लसणी फुटणे असे म्हणतात. १५-२० टक्के लसणी फुटल्यावर पाणी देणे बंद करावे. आणि १० ते १२ दिवसांनी लहान कुदळीने किंवा हाताने गड्डे उपटून काढावेत. गड्डे काढल्यानंतर कुदळीने किंवा खुरप्याने लागून फुटलेले गड्डे वेगळे काढावेत. काढलेली लसूण पाने आंबट ओली असतात. २० ते ३० सारख्या आकाराच्या गड्ड्याची जुडी बांधावी व पानांची वेणी बांधून घ्यावी. अशा जुड्या छप्परात हवेशीर ठिकाणी बांबूवर किंवा दोरीवर टांगून ठेवाव्यात. अशाप्रकारे तयार केलेला लसूण साठवणीत चांगला टिकून राहतो.
डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. प्रांजली गेडाम, डॉ. विजय महाजन
कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे