फळमाशी ही जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाची व गंभीर कीड असून, जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील अनेक सीताफळ उत्पादक शेतकरी या किडीने त्रस्त झाले आहेत. या फळमाशीचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीताफळ फळमाशी किडींचे तत्काळ नियंत्रण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांनी केंधळी येथे पाहणीदरम्यान केले आहे.
तालुका कृषी अधिकारी वाघमोडे म्हणाले की, सीताफळ फळमाशी आणि किडींचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रक्षक सापळे लावावेत. या सापळ्यात एक कुपी आहे. त्यात मिथाईल युजेनॉल लावून कापसाचा बोळा ठेवतात. त्यामुळे मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्या सापळ्यामध्ये आकर्षित होतात आणि आतमधील पाण्यात बुडून मरतात. शेतकऱ्यांनी पिकांच्या उंचीप्रमाणे हेक्टरी २० ते २५ सापळे झाडावर टांगून किंवा चार ते पाच फुटांवर ठेवावेत. १८ ते २० दिवसांनी पुन्हा मिथाईल युजेनॉल कापसाचा बोळा बदलावा.
सापळ्यातील मेलेल्या माश्या काढून टाकून हे सापळे स्वच्छ करून ठेवावेत. फळमाशी या किडीसाठी मिथाइल युजेनॉल हे रसायन असलेल्या पिवळ्या बाऊल सापळ्याचा वापर उपयोगी ठरतो. साध्या प्लॅस्टिकच्या बाटलीत हे रसायन ठेऊनही सापळे तयार करता येतात. त्याचप्रमाणे परिपक्व झालेली फळे गळून बागेत पडतात. त्यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते. ते टाळण्यासाठी बाग स्वच्छ करावी. फळमाशीची कोषावस्था जमिनीत असते. मातीत ती केवळ दोन-तीन सेंटीमीटरच खोल जाते. त्यामुळे माती हलवून घ्यावी, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी रासायनिक कीड नियंत्रणाकडे वळावे
• एकात्मिक कीड नियंत्रण हा फळमाशीवरील महत्त्वाचा उपाय असून, तो सामूहिक स्तरावर केल्यास त्याचा प्रभाव दिसून येतो. बागेची स्वच्छता सापळे हे कमी खर्चिक उपाय आहेत.
• गरज असेल तरच शेतकऱ्यांनी रासायनिक कीड नियंत्रणाकडे वळावे. असे जिल्हा कृषी अधिकारी जी. आर. कापसे, आर. ए. रोडगे यांनी सांगितले आहे.