शैलेश काटेइंदापूर : परवडत नसलेल्या उसाच्या शेतीला पर्याय म्हणून पाच एकर क्षेत्रात लावलेल्या गोल्डन जातीच्या सीताफळाच्या बागेने कौठळी येथील दत्तात्रय करचे या युवा शेतकऱ्याला दहा वर्षांत लाखो रुपये मिळवून दिले आहेत.
यंदाच्या वर्षी दहा ते अकरा टन सीताफळ विकले गेले आहे. त्यास प्रतिकिलो सरासरी ७५ ते १०० रुपये दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात एकूण ५० टन माल विकला जाईल, असे करचे यांनी सांगितले.
कौठळी येथे दत्तात्रय करचे यांचे १५ एकर क्षेत्र आहे. त्यातील बहुतेक क्षेत्रात ते उसाचे पीक घेत होते. मात्र, लागवड, मशागतीनंतर कारखान्यात ऊस गेल्यानंतर त्याचे बिल हातात येईपर्यंत विलंब लागतो.
तसेच दरातील चढ-उतारामुळे केलेल्या कष्टाच्या प्रमाणात न मिळणारा मोबदला यामुळे त्यांनी दहा वर्षांपूर्वी पाच एकर क्षेत्रांत गोल्डन जातीच्या सीताफळाची लागवड केली.
त्यासाठी गलांडवाडी येथून भीमा नदीवरून पाइपलाइन करून ती शेतापर्यंत आणली आहे. शेतातील विहिरीत त्या पाण्याची साठवणूक केली आहे. बोअरवेलद्वारे बागेला पाणी देण्यात येत आहे.
योग्य पाणी, खत व्यवस्थापन केल्यामुळे मागील दहा वर्षांच्या काळात करचे यांना सीताफळाच्या बागेने लाखो रुपये मिळवून दिले आहेत.
हैद्राबाद, बंगलोर, पटणा, दिल्ली, केरळ या ठिकाणी माल सुमारे अकरा टन गेला आहे. उचांकी दर ११० तर कमीतकमी ७५ रुपये दर मिळाला आहे.
आतापर्यंत दहा ते अकरा टन माल गेला आहे. एकूण ५० टनांतून चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. - दत्तात्रय करचे, सीताफळ उत्पादक, कौठळी