Join us

तोडणीला वेग; ऊसतोड मजुरांसह कारखान्यांचे ऊस तोडणी यंत्रही लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 11:30 AM

कुरुंदा, महागाव, किन्होळा आदी भागातील ऊस तोडणी ५० टक्क्यांच्यावर

वसमत विभागात यावर्षी तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र कमी झाले आहे. तालुक्यातील तीन साखर कारखान्यांनी नियोजन करुन ऊस तोडणीवर भर दिला आहे. याचबरोबर नांदेड, परभणी जिल्ह्यांतील कारखान्यांनी नजर ठेवत ऊस तोडणीला गती दिल्याचे पहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांसह ऊस तोडणीसाठी यंत्राचाही वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

वसमत विभागातील तीन कारखाना कार्यक्षेत्रामध्ये २४ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. यंदा लागवड क्षेत्र कमी असल्याने कारखान्यासमोर गाळप उद्दिष्टपूर्ती करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तीन कारखान्यांनी आतापर्यंत जवळपास २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. वसमत विभागातील उसावर नांदेड, परभणी जिल्ह्यांतील कारखान्यांनी नजर ठेवत ऊसतोड मजुरांसह कारखान्यांचे ऊस तोडणी यंत्रही कामाला लागले आहे.

दोन वर्षांपासून गूळ कारखाने तोट्यात

यंदा साखर कारखाने मार्चअखेर पर्यंत गाळप करतील का असा अंदाज बांधला जात आहे. गत दोन वर्षांपासून गूळ कारखाने तोट्यात चालत आहेत. बेरोजगार तरुणांनी कसाबसा आधार घेत व्यवसाय उभा केला आणि त्यात ऊस लागवड क्षेत्र कमी असल्याने त्यांची मोठी गोची झाली आहे.

२ हजार ५०० रुपयांनी शेतकऱ्यांच्या खाती रक्कम महिनाभरापासून साखर कारखाने गाळप करु लागले आहेत. गाळप सुरुवातीस उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खाती जमा होत आहे, नांदेड जिल्ह्यातील व टोकाई कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खाती २ हजार ५०० रुपयांप्रमाणे बिलाचा पहिला हप्ता जमा केला आहे. त्यामुळे कुरुंदा, महागाव, किन्होळा, कवठा, महंमदपूरवाडी, सोमठाणा, पार्टी, गिरगाव, वसमत, दगडगाव, असेगाव, बाभूळगाव आदी भागातील ऊस तोडणी ५० टक्क्यांच्यावर आटोपत आली असल्याचे दिसते.

टॅग्स :ऊसशेतकरी