पुणे : देशातील जनावरांचे इअर टॅगिंग करण्यासाठी केंद्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाकडून सर्व पशुपालक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. १ जून नंतर इअर टॅगिंग नसलेल्या जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही असा आदेश काढूनही इअर टॅगिंगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग अॅक्शन मोडवर आला आहे.
जनावरांचे इअर टॅगिंग का करावे?
- जनावरांची खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनांचे इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे.
- खरेदीविक्री नोंद ईअरटॅगिंगसह केल्याने शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखता येईल. तसेच जनावरांच्या खरेदीविक्री दरात होणारे बदल लक्षात घेऊन नियोजन करता येईल.
- टॅगिंग केल्याने जनावराला यापूर्वी लसीकरण झाले किंवा नाही हे लक्षात घेऊन लसीकरण करून घेणे शक्य होईल. जेणेकरून आजारी जनावर खरेदी केल्याने होणारे शेतकऱ्याचे नुकसान कमी करता येईल.
- बऱ्याचदा रोगाच्या साथी बाहेरच्या राज्यातून होणाऱ्या जनावराच्या विक्रीतून आपल्या राज्यात पसरतात. अशावेळी टॅगिंगमुळे साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय प्रक्रियेत मदत होते.
- यामुळे विशिष्ट भागातून जनावरांची खरेदी विक्री वाढणे, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ या अनुषंगाने निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
- बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी विक्री पॅकिंग करून झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
- १ जून नंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आली आहे.
- पशुपालकांना पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा पक्का तसेच वन्य पशुच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.
- बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक इअर टॅगिंग शिवाय करता येणार नाही.
दरम्यान, राज्यभरामध्ये पशुधनाचे इअर टॅगिंग करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत असून नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांचे इअर टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे.