Dairy Business :
विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्याकरिता राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्प्पा-२ राबविण्यात येणार आहे.
त्यात अमरावती विभागातील वाशिमसह पाचही जिल्ह्यांचा समावेश असून ८ वर्षांनंतर राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे दुग्ध व्यवसायाला गती मिळणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
दुग्धव्यवसाय हा शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा व्यवसाय भरभराटीस आला तर शेतकरी व पशुपालकांना आर्थिक उन्नती साधता येणे शक्य होईल,
हा उद्देश समोर ठेवून शासनाच्या मान्यतेने वर्ष २०१६ मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांत दुग्धविकास प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याचा अपेक्षित फायदा होऊन दुग्धव्यवसायाला उभारी मिळाली होती.
आता तीन वर्षांसाठी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असून, त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
'दुग्धविकास प्रकल्प टप्पा-२' मध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोलासह वाशिम जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचाही प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
'दुग्धविकास प्रकल्प टप्पा-२'ची उद्दिष्टे
गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची व्यवस्था तसेच भ्रूण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढविणे,
शेतकऱ्यांसाठी वैरण विकास कार्यक्रम राबवून गुरांना संतुलित आहार व दर्जेदार चारा पुरवठा करणे,
पशू आरोग्य सुविधा पुरविणे, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगारनिर्मिती करणे, अशी 'दुग्धविकास प्रकल्प टप्पा-२'ची प्रमुख उद्दिष्टे आहेत.