रायगड जिल्ह्यात मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवेळी पावसाने नऊ तालुक्यात ३३ टक्क्यांहून अधिक ९७२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासात नुकसानीचे फोटो पीक विमा अॅपवर अपलोड करायचे आहेत. आतापर्यंत सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो अॅपवर अपलोड केले आहेत, ज्या शेतकऱ्यांना याबाबत अडचण असल्यास कृषी सहाय्यकाची मदत घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
पावसाळा हंगाम जाऊन थंडी सुरू झाली आहे. मात्र तरीही पावसाचे आगमन सुरूच आहे. सध्या भात कापणीची लगबग असताना अवेळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळ नंतर जिल्ह्यातील अनेक भागात अवेळी पावसाने सुरुवात केली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ७५ टक्के भात कापणी पूर्ण झाली आहे. अनेकांनी भात कापणी करून शेतात रचून ठेवला तर काहींनी त्वरित मळणी केल्याने त्याचे नुकसान काही प्रमाणत टळले आहे.
७२ तासांच्या आत नोंद करा
- अवकाळी पावसात अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयांत पीक विमा योजनेत नोंदणी केली आहे, आशा शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची नोंद तत्काळ करा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
- ७२ तासाच्या आत चोलामंडल पीक विमा कंपनी किंवा आपले संबंधित बँक, कृषी किंवा महसूल विभागाचे अधिकारी किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांकावर (१८००२०८९२००) देणे बंधनकारक आहे.
संपर्क न झाल्यास
काही कारणास्तव टोल फ्री नंबर संपर्क झाला नाही तर सदर आपत्तीची माहिती तालुकास्तरीय विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी मोबाइल नंबर किंवा कंपनीचे कार्यालयात देणे.
सुट्टीच्या दिवशीही सेवा
सदर कार्यालयात शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांना या आपत्ती परिस्थितीमध्ये मार्गदर्शन व मदत करतील.
सव्वाशे शेतकऱ्यांनी केले नुकसानीचे फोटो अपलोड
- अनेक भागात भात कापणी अपुरी असल्याने पीक पावसाने भिजले आहे. तर रचून ठेवलेले पीकही भिजले असल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अवेळी आलेल्या पावसाने पोलादपूर, महाड़, कर्जत, खालापूर, रोहा, श्रीवर्धन, पेण, पाली, माणगाव या तालुक्यात शेतीचे नुकसान झाले आहे.
- नुकसान झालेल्या शेतीच्या २ नुकसानीचे फोटो शेतकऱ्यांनी ७२ तासात अँपवर अपलोड करायचे आहे. त्यांनतर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. आतापर्यंत सव्वाशे शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो अपलोड केले असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले असेल त्यांनी ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. - मनीषा भुजबळ, तालुका कृषी अधिकारी