Join us

दुबार पेरणीचे गडद सावट; वाढत्या उन्हामुळे पिकं टाकताहेत माना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 2:50 PM

नांदेड जिल्ह्यावर दुबार पेरणीचे गडद सावट, पाचशे कोटींचा खर्च जाणार मातीत !

अपेक्षित पाऊस झाल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन-चार दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावणार आहे.

या अस्मानी संकटाचा शेतकऱ्यास सामना करताना आजपर्यंत झालेल्या पेरणीवर केलेला जवळपास पाचशे कोटी रुपयांचा खर्च मातीमोल होणार आहे. त्यानंतर पुन्हा पेरणीसाठी कोट्यवधी रुपयांची जुळवाजुळव करावी लागू शकते.

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ७ लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात ११५ मिमी पाऊस झाला असून जवळपास २ लाख ९४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली असून त्यांची पिकं काळ्या पाण्यावर उगवली आहेत; मात्र पावसाने दिलेल्या उघडीपमुळे आता तीदेखील सुकत आहेत.

दहा लाख एकरांवरील पेरणीमध्ये सर्वाधिक ३ लाख ७५ हजार हेक्टरवर सोयाबीनची तर अडीच लाख एकरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्वारी, तूर, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडून पावसाचा अंदाज घेऊन तुषार सिंचन आणि ठिबकद्वारे पिकांना पाणी दिले जात आहे; मात्र प्रत्येकाकडे पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांना जगविणे शक्य नाही. त्यात उष्णता वाढल्याने पिकं माना टाकत आहेत.

उगवण्यापूर्वीच सुकलेली पिकं पाहून शेतकऱ्यांचे डोळे भरून येत आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागेल, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. कोट्यवधींचा खर्च मातीत जाईल.

सोयाबीन परेणीचा स्वर्च

बियाणे बॅग (सोयाबीन) ३२००

मशागत २८००

पेरणी खर्च व खत १५००

कपाशी लागवड स्वर्च (एकरी)

कपाशी बियाणे ९००

लागवड खर्च १०००

मशागत २८००

तीन लाख हेक्टरसाठी ५०५ कोटींचा खर्च

■ सोयाबीन पेरणीसाठी अंदाजित एकरी ९ हजार रुपये खर्च येतो तर कपाशी लागवडीसाठी अंदाजित ४ हजार ७०० रुपयांचा खर्च ग्राह्य धरला जातो. त्यानुसार आजपर्यंत झालेल्या अडीच लाख एकरवरील कपाशी लागवडीसाठी अंदाजित एकरी ४७०० प्रमाणे ११७ कोटी ५० लाख रूपये तर ३ लाख ७५ हजार एकरातील सोयाबीन पेरणीसाठी अंदाजित खर्च ३३७ कोटी ५० लाखांचा खर्च झालेला आहे.

■ सोयाबीन पेरणी आणि कपाशी लागवडीसाठी जवळपास ४५५ कोटी रुपये खर्च झालेला आहे, त्याचबरोबर इतर उडीद, मूग, तूर आदी पिकासाठी अंदाजित ५० कोटींचा खर्च आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या तीन लाख हेक्टरवरील पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जवळपास ५०५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस झाला नाही तर हा खर्च वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवामानाचा अंदाज हवेतच

हवामान विभागाने जिल्ह्यात २६ व २७ जून रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करत येलो अलर्ट जारी केला होता; परंतु २६ जून बुधवार रोजी पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज पुन्हा हवेतच विरला आहे. शुक्रवार २७ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. हा अंदाज तरी खरा ठरावा यासाठी पावसासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

टॅग्स :शेतीशेतकरीखरीपपाऊसनांदेडनांदेडशेती क्षेत्रपीक व्यवस्थापनपेरणीलागवड, मशागत