पुणे : नोंदणी विभागासाठी काम करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीने दस्त नोंदणीचा डेटा स्थलांतरित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे शुक्रवारी (दि. २६) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. २७) रात्री साडेनऊपर्यंत राज्यातील सुटीच्या दिवशी अर्थात शनिवारी सुरू असणारे दस्त नोंदणीची कार्यालये बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी कळविले आहे.
यात मुंबई, पुणे व नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील शनिवारी सुरू असलेली दस्त नोंदणी होणार नाही. त्यात पुण्यातील पाच कार्यालयांचा समावेश आहे. नोंदणी विभागाला दस्तनोंदणीसाठी सर्व्हरवरील डेटा स्थलांतरित करण्यात येणार आहे.
त्यासाठीचे मुख्य सर्व्हर मुंबई येथे सुरू करण्यात आले आहे. पुणे येथील सर्व्हरवरील डेटा या मुख्य सर्व्हरवर स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासाठी किमान २४ तासांचा कालावधी लागणार आहे. परिणामी आय सरिता या प्रणालीवर काम करणाऱ्या दस्तनोंदणीचे सॉफ्टवेअर बंद ठेवावे लागणार आहे.
त्यासाठी नोंदणी विभागाने शुक्रवारी रात्री साडेनऊ ते (दि. २६) ते शनिवारी (दि. २७) रात्री साडेनऊपर्यंत दस्तनोंदणीसह ऑनलाइन भाडेकरार, ऑनलाइन दस्तनोंदणी, तसेच नोटीस ऑफ इंटिमेशन या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात पुणे, मुंबईसह बहुतांश जिल्ह्यांत शनिवारी काही कार्यालये सुरू ठेवण्यात येतात.