महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अर्थात महाएफपीसी चा दहावा वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाएफपीसी हा देशभरातील सर्वात मोठा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा महासंघ असून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान अंतर्गत देशभरात बांधावरील हमीभाव खरेदीचे यशस्वी असे मॉडेल राबविण्यात यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
पुणे येथील कार्यक्रमासाठी माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल उपस्थित होते. यावेळी डॉ. अजित कानिटकर यांचे शेतकरी उत्पादक कंपन्यांची पुढील दिशा या विषयावर बीज भाषण झाले.
यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत प्रातिनिधिक स्वरूपात दिपक पाटील, भगवानराव डोंगरे, शैलेश मळगे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात योगेश थोरात यांनी मागील दहा वर्षातील कंपनीचा प्रवास व उल्लेखनीय कामगिरी याबाबत माहिती दिली.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘महाएफपीसी दशकपूर्ती : सहकाराची नवी दिशा' शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कृतीशील पाऊलखुणा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
याचबरोबर हिंगोली, अमरावती, भंडारा, नांदेड, कोल्हापूर, व गोवा राज्यात पणजी येथे वर्धापन दिन कार्यक्रम साजरे केले, आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.