श्रीगोंदा : लिंबू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हैसूर, गाझियाबाद येथे लिंबू व इतर शेतमाल विक्रीसाठी केंद्र करणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.
रविवारी बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते बोलत होते. लोखंडे म्हणाले, कांदा अनुदान घोटाळाप्रकरणी सहायक निबंधक आणि लेखा परीक्षण अधिकारी यांना सहआरोपी करण्याची मागणी आहे. ते दोषी आढळल्यास सहआरोपी केले जाईल. तसेच दिलीप डेबरे यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केले जाईल.
माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, बाजार समितीच्या सभापतींसह संचालक मंडळ चांगले काम करीत आहे. बाजार समितीची घडी बसविण्याचे काम त्यांनी केले आहे. टिळक भोस यांनी कांदा अनुदानातील घोटाळा आणि शेतकऱ्यांची लूट, काष्टी बाजाराच्या बाहेर ग्रामपंचायतीकडून बेकायदा वसुली सुरू असल्याकडे लक्ष वेधले.
यावेळी बाबासाहेब इथापे, बाळासाहेब नलगे, बाळासाहेब गिरमकर, महेश तावरे, अॅड. विठ्ठल काकडे, राजेंद्र म्हस्के, शंकर भुजबळ, हनुमंत जगताप, शांताराम पोटे यांनी विचार मांडले. अहवाल वाचन प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी केले.
यावेळी केशवभाऊ मगर, हरिदास शिर्के, लक्ष्मण नलगे, विजय मुथा, नितीन डुबल, रामदास झेंडे, अशोक नवले, आदी उपस्थित होते. अॅड. महेश दरेकर यांनी आभार मानले.