Join us

कोल्हापूर विभागाच्या साखर उताऱ्यात घट; शेतकऱ्यांना बसेल का याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:50 AM

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. या हंगामात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांनी आपले हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, २ कोटी ४० लाख ८२ हजार ७४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. या हंगामात कोल्हापूरसांगली जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांनी आपले हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, २ कोटी ४० लाख ८२ हजार ७४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

पण सरासरी उताऱ्यात १.७१ टक्के घट झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असल्याची शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी भीती व्यक्त केली आहे. यावर्षी कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज शासकीय पातळीवर वर्तवण्यात येत होता. पण हा अंदाज चुकला व एकरी उत्पादनात वाढ झाली; पण सरासरी साखर उताऱ्यात घट झाल्याचे समोर आले आहे.

कोल्हापूर विभागात कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाले. या सर्व साखर कारखान्यांनी यशस्वी हंगाम पूर्ण केले. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी १ कोटी ५१ लाख ९९ हजार ४२० मेट्रिक टन गाळप केले आहे.

११.७३ टक्के सरासरी साखर उताऱ्यासह १ कोटी ७८ लाख २५ हजार ५५९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षीच्या साखर उताऱ्यात १.७१ टक्के उताऱ्यात घट झाली आहे. सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ८८ लाख ३३ हजार २४५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ११.३ सरासरी उताऱ्यासह एक कोटी ४१ लाख ८८६ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

सांगली जिल्ह्यात १.९१ टक्के उताऱ्यात घट झाली आहे. कोल्हापूर विभागात १.७१ टक्के सरासरी साखर उताऱ्यात मोठी घट झाली आहे. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही साखर उताऱ्यातील घट शेतकऱ्यांना ऊसदरासाठी मारक ठरणार असल्याने संताप व्यक्त केला.

साखर कारखान्याचे उतारा घटीत षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. १.७१ टक्के घट झाल्याने १०.२५ टक्के उताऱ्यापुढील प्रत्येक टक्क्याला मिळणाऱ्या ३१५ रुपयांचा विचार केल्यास ५३९ रुपयांचा फटका बसणार आहे.

यावेळी इथेनॉलसाठी काही साखर कारखान्यांनी बी-हेवी मोलेंशिस व उसाचा रस वळवल्याने उताऱ्यात ही घट आहे. शासनाने अधिकृत संस्था उभी करून उतारा तपासल्यास कारखानदारांची मखलाशी उघड होईल. - धनाजी चुडमुंगे (आंदोलन अंकुश)

अधिक वाचा: राज्यात एक कोटी गाळप; १०९४ लाख क्विंटल साखर उत्पादन

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीसांगलीकोल्हापूर