Join us

कोथिंबीरच्या दरात घसरण, किलोला ३० रुपयेही मिळेनात उत्पादन खर्च निघेना; शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:25 AM

उशिरापर्यंत विक्री न झालेली कोथिंबीर जागेवर ठेवून काहींनी गाव गाठले.

जेवणाची चव वाढविणारी कोथिंबीर सध्या उत्पादकांच्या तोंडची चव घालवणारी ठरली आहे. पेरणी, काढणीसाठी लागणारा खर्चही पदरात पडत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या लातूरच्या बाजारात कोथिंबीरला प्रतिकिलो २५ ते ३० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात कोथिंबीर घेऊन आलेले शेतकरी रात्री उरलेली कोथिंबीर जागेवरच ठेवून जात आहेत. परतीच्या पावसाने दगा दिल्यावर अनेकांनी रबी पेरणीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. ज्यांच्याकडे थोडाफार पाणीसाठा होता, अशा शेतकऱ्यांनी कोथिंबीरची पेरणी केली.

दिवाळीत दरवर्षी कोथिंबीरला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी पेरणी करतात. यंदा मात्र दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कोथिंबीर काढणीसाठी लागणारा रोजगारही अंगलट येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत शनिवारी लातूरच्या बाजारात मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आली होती त्यामुळे अनेकांनी पाव किलोपेक्ष अधिकची जुडी दहा रुपयांनी विक्र केली. उशिरापर्यंत विक्री न झालेली कोथिंबीर जागेवर ठेवून काहींनी गाव गाठले.

आठ दिवसांपासून चढ-उतार...

लातूरच्या बाजारात मागील आठ दिवसांपासून कोथिंबीरच्या दरात चढ-उतार होत आहे. प्रतिक्चिंटल दीड ते दोन हजारांपर्यंत दर शेतकऱ्यांना मिळत आहेत. किरकोळ बाजारात कोथिंबीरची विक्री ३० ते ४० रुपये किलोने होत आहे.

बाजार समितीत काय मिळाला भाव?

काल छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाजार समितीत २२ हजार कोथिंबीरीच्या नगांची आवक झाली. याला सर्वसाधारण २७५ रुपये भाव मिळाला.पुण्यात मांजरी येथे २५ हजार १८० नग कोथिंबीरीची आवक झाली. प्रति नग ४ रुपये एकढा कमी भाव मिळाला.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरी