राजाराम लोंढेकोल्हापूर: धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध राधानगरी असलेल्या तालुक्यातील घटते पर्जन्यमान सगळ्यांनाच चिंता करायला लावणारे आहे. 'राधानगरी' तालुक्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस झाला असून गगनबावड्यातील पाऊसही कमी होत आहे. कोल्हापूर जिल्हा सुजलाम होण्यात राधानगरी तालुक्यातील धरणांचे योगदान खूप मोठे आहे. राधानगरी तालुक्यात 'राधानगरी', 'दूधगंगा' व 'तुळशी' हे तीन मोठे प्रकल्प आहेत. या तीन प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ३७.२२ टीएमसी आहे. त्यामुळे या धरणांमुळेच जिल्हा हिरवागार दिसतो.
मात्र, अलीकडील पाच-सात वर्षात या तालुक्यातील पर्जन्यमान खूप कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. 'राधानगरी तालुक्याची वार्षिक सरासरी ३५७५.३ मिलिमीटर आहे. मात्र, प्रत्येक वर्षी कसबसे ३,००० मिलिमीटरपर्यंतच पाऊस पोहोचतो. यंदा मान्सूनचे तीन महिने संपत आले आहेत, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ८१७ मिलिमीटर (४३ टक्केच) पाऊस झाला आहे. त्यातही राधानगरी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे. गगनबावडा तालुक्यातही यंदा केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे.
'भुदरगड'मध्ये ८८ टक्के पाऊसगेल्या काही वर्षापासून भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस होत आहे. राधानगरी तालुक्याला लागूनच असलेल्या 'भुदरगड' मध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तब्बल ८८ टक्के पाऊस झाला आहे.
विहिरींची पाणी पातळी घसरणार- पावसाने सरासरी गाठली नाहीतर जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जाणार आहे.- त्याचा थेट फटका विहीरी, बोअरवेलना बसणार आहे.
तुलनात्मक पाऊस, मिलिमीटरमध्ये
तालुका | वार्षिक सरासरी | २७ ऑगस्ट २०२२ | २७ ऑगस्ट २०२३ |
राधानगरी | ३५७५ | १५१९ | १०७९ |
चंदगड | २७८४ | १५२९ | १२१५ |
गडहिंग्लज | ९३३ | ६५३ | ४६९ |
गगनबावडा | ५५०८ | ३२६८ | २७७६ |
शिरोळ | ५७१ | २७१ | २७३ |
हातकणंगले | ६६८ | ४३४ | ३३२ |
भुदरगड | १५९२ | १६१६ | १४१० |
कागल | ७९२ | ७८९ | ५७६ |
पन्हाळा | १६१२ | ११३५ | ८५१ |
करवीर | ९८३ | ७९८ | ५९४ |
आजरा | १८७५ | १३१९ | १०८९ |
शाहूवाडी | १७८८ | १७१३ | ११७२ |