नीलेश जोशी
बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून, अतिवृष्टीची वारंवारीताही जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नद्यांमध्ये गाळ, राडारोड पडून पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४ मोठ्या नद्यांपैकी (rivers) मन, तोरणा आणि पैनगंगा नदीपात्रांच्या १३० किमी लांबीचे खोलीकरण करण्याच्या दृष्टीने २७ जुलै रोजी मान्यता देण्यात आली.
प्रारंभिक स्तरावरील सर्वेक्षणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २७ जुलै रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आ. किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, राजेश एकडे, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
गेल्या सहा वर्षांत अतिवृष्टीचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. गेल्या वर्षीही जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांना याचा मोठा फटका बसला होता. नदीपात्रामध्ये वाढलेले अतिक्रमण, गाळ, राडारोडा यामुळे नदीपात्रात पुराचे पाणी सामावत नसून ते वाट दिलेल्या दिशेने जाते. त्यातून जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीची व्याप्ती वाढत आहे. परिणामस्वरूप गेल्यावर्षीपासून हा मुद्दा चर्चेत होता. त्यावर अखेर सात महिन्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ८६ गावांना पुराचा धोका
पूरप्रवण क्षेत्रातील जवळपास २८६ गावांपैकी ८६ गावांना दरवर्षी पुराचा धोका जिल्ह्यात असतो. यामध्ये तालुक्यातील १२, शेगाव दहा, नांदुरा २२, जळगाव जामोद आठ आणि संग्रामपूर तालुक्यातील पाच गावांचा प्राधान्याने समावेश आहे. गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीदरम्यान यात काही नवीन गावांचाही समावेश करण्याची शक्यता आहे. पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नळगंगा धामना, आमना, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वाण या प्रमुख १४ नद्या व त्यांच्या उपनद्यांचा प्रामुख्याने यात समावेश आहे.
पैनगंगा, मन आणि तोरणाचे होणार सर्वेक्षण
पैनगंगा, मन आणि तोरणा या तीन नद्यांचे आता सर्वेक्षण होणार असून, बुलढाणा पाटबंधारे मंडळाच्या अहवालानुसार या तिन्ही नद्यांमध्ये ३१ हजार ३५० घनमीटर गाळ, राडारोडा असल्याचा अंदाज आहे. तो काढण्याच्या दृष्टीने एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. एकट्या मन नदीपात्रामध्ये ३८ हजार ४७० घनमीटर, तोरणामध्ये २३ हजार ४२५ घनमीटर आणि पैनगंगेमध्ये १९ हजार ४५५ घनमीटर गाळ, राडारोडा असल्याचा बुलढाणा पाटबंधारे मंडळाचा अहवालात म्हटले आहे.
तो काढण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे अमरावती येथील मुख्य अभियंता यांना एक अंदाजपत्रकही प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या नद्यांच्या पूरप्रवण क्षेत्रातील बाधित होणाऱ्या शहरी भागातील पुराचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने तसेच नद्यांची वहन क्षमता पुनस्र्था पीत करण्यासाठी हे सर्वेक्षण आता होईल.