Join us

शेणखताला वाढली मागणी, भावही मिळतोय चांगला; मशागतीच्या कामांना आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:43 AM

रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. मातीतील घटकांच्या वाढीसाठी वर्षानुवर्षे कुजवलेले शेणखत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.

शेती उत्पादन वाढीसाठी बहुतांश शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो; मात्र रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. त्यामुळे तो पूर्वीप्रमाणे चांगला रहावा म्हणून लातूर तालुक्यातील बोरगाव काळे व परिसरातील शेतकरी शेतीसाठी शेणखताचा वापर करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेणखताला मागणी वाढली असून सोन्याचा भाव आला आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. यांत्रिकीकरणामुळे पशुधनाच्या संख्येत दरवर्षी घट होतपशुधनाची संख्या कमी असल्याने शेणखताची कमतरता जाणवत आहे. दरम्यान, कृषी विभागांकडून सेंद्रिय खताच्या वापरासाठी आणि रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी करून राशी झाल्या आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. दरम्यान, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखत टाकण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे. सध्या शेणखताला मागणी वाढली असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेणखताला सोन्याचा भाव येत आहे.

शेतकऱ्यांनी करावा शेणखताचा वापर

शेतकऱ्यांनी शेत जमिनीत शेणखताचा वापर करावा म्हणून कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. मातीतील घटकांच्या वाढीसाठी वर्षानुवर्षे कुजवलेले शेणखत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. तसेच शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून खताची मात्रा दिल्यासही जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होते, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :खतेशेतीबाजार