नॅनो युरिया खताबाबत शेतकऱ्यांमध्ये गतवर्षी गैरसमज अधिक असल्याने वापर अल्प झाला होता. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात अनेकांचे गैरसमज दूर झाल्याने मागणी वाढली.
परिणामी, चंद्रपुर जिल्हा प्रशासनाने नॅनो युरिया खताच्या तब्बल ६२ हजार ९०० बॉटल आवंटीत केल्या. यातून २ हजार ८३० मेट्रिक टन युरियाची बचत होणार आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
..अशी घ्या खबरदारी
■ नॅनो युरियाची बाटली वापरण्यापूर्वी चांगली हलवा. नॅनो युरिया (Nano Urea) हे विषमुक्त आहे. पण सुरक्षिततेसाठी पिकावर फवारणी करताना फेस मास्क व हातमोजे वापरावे.
■ एकसमान फवारणीसाठी सपाट पंखा किंवा कट नोजल वापरा. सकाळी किंवा संध्याकाळीच फवारणी करावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवावी.
गवर्षीची स्थिती
चंद्रपुर जिल्ह्यात गतवर्षी २०२३ मध्ये ११ हजार ७६४ बॉटल बोलविण्यात आल्या होत्या. यातून ५२९ मेट्रिक टन युरियाची बचत झाली. यंदाच्या खरीप हंगामात (Kharif) कृषी विभागाने (Agriculture Department) ६२ हजार ९०० बॉटल आवंटीत केल्या.
नॅनो युरिया म्हणजे काय?
'नॅनो युरिया हे प्रामुख्याने नॅनो टेक्नॉलॉजीचा (Nano Technology) वापर करून तयार करण्यात आलेले खत आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, हे खत पिकांच्या नायट्रोजनची गरज पूर्ण करते. शेतकऱ्यांना सर्वांत जास्त प्रमाणात युरिया लागत असतो. पंरतु युरियाचा काही प्रमाणात तुटवडा भासत असल्याने यावर सरकारने पर्याय म्हणून नॅनो युरियाचा पुरवठा करीत आहे. या युरियाची अर्धा लिटरची बाटली पारंपरिक युरियाच्या एका पोत्याएवढे पोषक तत्त्वे देतो. पिकांच्या उत्पादनासाठी फायदेशीर व उत्पन्नात वाढीला मदत करतो.
.. असा होतो फायदा
नॅनो युरियाची पिकांच्या पानांवर फवारणी केल्यानंतर तो सहजपणे पर्णरंध्रातून वनस्पती पेशीमध्ये प्रवेश करतो. पेशीमध्ये त्यांचे एकत्रीकरण केले जाते आणि पिकाच्या गरजेनुसार वनस्पतीमध्ये तो वितरित केला जाते. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत होता. मात्र द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया पिकांसाठी उपयुक्त ठरला.