बीड जिल्ह्यातील धारूर तालुका रानमेव्यासाठी प्रसिद्ध असून अनेक ठिकाणी घाटमाथा, डोंगर आणि वनक्षेत्रावर सीताफळाचे उत्पादन आहे. यावर्षी सीताफळाला चांगलीच गोडी असल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. जोमदार सीताफळ उत्पादनामुळे मजुराला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध झाले आहे. मात्र, शासनाकडून जिल्हा सीताफळ सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेसाठी निश्चित करूनदेखील काम न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
वनविभागाच्या शेकडो एकर जमिनीवर नैसर्गिक पद्धतीने सीताफळ उत्पादन होते. पीक तोडणीच्या वेळी वनविभागाकडून वन क्षेत्रनिहाय तात्पुरत्या स्वरूपाचा लिलाव केला जातो. यात दरवर्षी अनेक शेतकरी लिलाव पद्धतीने सीताफळ वनक्षेत्र घेतात. दरम्यान, शहरासह जिल्हाभरात येथून सीताफळ विक्री होत असते. तसेच राज्याबाहेर देखील सीताफळाची निर्यात केली जात आहे. यावर्षी पोषक वातावरणामुळे सीताफळ उत्पादन देखील वाढले आहे. त्याचबरोबर मागणीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दोन ते तीन पटीने सीताफळ विक्री वाढली आहे. यावर्षी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मजूरदेखील समाधान व्यक्त करत आहेत.
धारूरला सीताफळ संशोधन, प्रक्रिया केंद्र उभारावे
गत पंधरा वर्षापासून सीताफळ संशोधन व प्रक्रिया केंद्र शहरात उभारावे, अशी मागणी होत आहे. मात्र, केवळ अंबाजोगाई येथेच शासनाने संशोधन केंद्राचे काम सुरू केले आहे. धारूरमध्ये केंद्र उभारल्यास सीताफळ उत्पादनाला चालना मिळेल. तालुक्यातील अनेकांच्या हाताला रोजगार देखील मिळणार आहे. शासनाने तालुक्याची गरज लक्षात घेऊन शहरातच केंद्र निर्माण करावे, अशी मागणी विनायक शिनगारे व शेतकऱ्यांनी केली आहे.