पावसाळ्यातच रानात उगवणाऱ्या टेकोड्यांच्या (जंगली मशरूम) खरेदीसाठी रानभाज्यांची ओढ असणारे नागरिक सकाळ सकाळीच बाजारात उतरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पावसाळ्यात निरनिराळ्या रानभाज्यांची धूम असते. आरोग्याच्या दृष्टीने आणि वातावरणानुसार या भाज्यांची महतीही मोठी आहे. पावसाळ्यातच गर्जन झाले की, जंगली भागात टेकोडे उगवतात. हे टेकोडे रुचकर असून, या पावसाळी वनस्पतीची गोडी ग्रामीण भागातील नागरिकांना आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित पाऊस असून, हे टेकोडे सकाळ सकाळीच बाजारात अवतरत आहेत.
सकाळनंतर टेकोडे बाजारात दिसत नसल्याने नागरिकही सकाळीच बाजारात येण्यास उत्सुक असतात. नागपुर जिल्ह्यातील रामटेकच्या बसस्टॅण्ड चौकात हे टेकोडे विक्रीसाठी आणले जात आहेत.
तर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात टेकोड्यांना सात्या या नावाने ओळखले जाते. टेकोडे सध्या १,६०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. कुठेकुठे ५० रुपये जुडी प्रमाणेही विकले जात आहेत. एका जुडीमध्ये ६ ते ८ टेकोडे असतात.
वर्षातून एकदाच होतात उपलब्ध
टेकोडे अतिशय रुचकर असल्याने व वर्षातून केवळ जुलै ते ऑगस्ट महिन्यात येत असतात. वर्षातून एकदा येत असल्याने लोकही आतूर असतात. टेकोड्यांमध्ये मुसेवाडी, नवेगाव, उमरी, हिवराबाजार, देवलापार, पवनी या जंगल भागातील लोकांना चांगला हंगामी रोजगार मिळतो.
आदिवासी भागातील लोक जंगलात जाऊन वारुळावर सकाळी टेकोडे शोधतात. जंगलात फुकट मिळत असले तरी टेकोडे शोधण्याची मेहनत जास्त आहे. दररोज पाऊस आला तर वारुळावर टेकोडे मिळतात. पाऊस नाही आला तर टेकोडे मिळत नाहीत.