सागर कुटे
राज्यात यंदा तेलबिया पिकांची लागवड घटल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी ७२,६९९ हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांची लागवड झाली होती, मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन ६८,२३९ हेक्टरवर आले आहे. त्यामुळे लागवडीत तब्बल ४,४६० हेक्टरनी घट झाली आहे.
तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कर्जसुविधा आणि उत्तम दर्जाच्या बियाण्यांसाठी शिबिरे घेतली जात आहेत. मात्र, तरीही लागवड क्षेत्र घटल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
तेलबिया क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तेलबिया | गतवर्षीचे क्षेत्र | यंदाचे क्षेत्र |
करडई | ४३,३६० | ३४,१४२ |
जवस | ७,१६५ | ६,०२० |
तीळ | १,४२७ | २,०२९ |
सूर्यफूल | २,३९८ | २,३५६ |
इतर | १८,३६८ | २३,६९२ |
यंदा झालेली लागवड
७२,६९९ हेक्टरवर गतवर्षी तेलबिया पिकांची लागवड झाली; मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन ६८,२३९ हेक्टरवर आले.
काय सांगते आकडेवारी?
राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ५३.९७ लाख हेक्टर आहे. मात्र, ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ६४.४३ लाख हेक्टर (११९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत पेरणीचे क्षेत्र ५७.८१ लाख हेक्टर (१०७टक्के) होते.
कमी लागवडीची प्रमुख कारणे
वन्यप्राण्यांचा त्रास, पीकविम्याचा अपुरा लाभ, तसेच तेलबिया पिकांचे बाजारभाव आणि उत्पादन क्षमता या कारणांमुळे शेतकरी या पिकांकडे कमी प्रमाणात वळले आहेत. काही शेतकऱ्यांनी इतर फायदेशीर पिकांची निवड केली आहे; त्यामुळे तेलबियांची लागवड घटली आहे. कमी नफा, उत्पादनाच्या स्थिरतेअभावी शेतकरी या पिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
तंत्रज्ञानाधारित उपाय गरजेचे
राज्य, केंद्र सरकारने तेलबिया उत्पादनाच्या गुणवत्तेवर भर देण्याची आवश्यकता आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, स्थानिक पातळीवर अधिक शेतकऱ्यांना सल्ला आणि मार्गदर्शन देण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांमुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
हेही वाचा : Success Story : कर्करोगापासून मिळू शकते सुटका; पौष्टिक डाळी आहारामधून कमी फक्त करू नका