Join us

India's Textile Industry : बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:47 AM

India's Textile Industry Growth Opportunities : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे.

अतुल आंबीइचलकरंजी : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे.

या कालावधीत केंद्र सरकारकडून चालना मिळाल्यास भारतातीलवस्त्रोद्योग जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट करू शकेल. त्यासाठी भारतातील उत्पादकाला बळ देण्यासह निर्यातीसाठी सवलत देणे गरजेचे आहे.

भारतातील वस्त्रोद्योग गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या छायेखाली आहे. त्याची मुख्य कारणे म्हणजे उत्पादनाचा खर्च जास्त आणि आयात-निर्यात धोरण ही आहेत. भारतातील वीज, कामगार आणि पर्यावरणासंदर्भातील खर्च इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याने भारतात उत्पादित होणाऱ्या कापडाचा खर्च जास्त होतो.

त्या तुलनेत चीन व बांगलादेशमध्ये वरील तीनही बाबी स्वस्तात उपलब्ध असल्याने तेथील कापड उत्पादनाचा खर्च अत्यल्प आहे. परिणामी चीनचे कापड बांगलादेशमार्गे भारतात 'चिंधी' या नावाखाली अतिशय स्वस्त दरात सहज उपलब्ध होते.

बांगलादेशातील परिस्थितीमुळे ते कापडही भारतात पोहोचेल, अशी सध्या स्थिती नाही. त्याचबरोबर बांगलादेशात गारमेंट कारखाने ठप्प आहेत. तसेच ते लवकर पूर्वपदावर येण्याची चिन्हे नसल्याने या कालावधीत भारतातील उत्पादित कापडाला जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी आयात-निर्यात धोरणात शिथिलता आणून बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याची गरज आहे.

देशातील एकूण वस्त्रोद्योग क्षेत्रातील ५५ टक्के वस्त्रोद्योग महाराष्ट्रात आहे. त्याचबरोबर भारतातील उत्पादित कापूस मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केला जात होता. तेथील सद्यःस्थितीमुळे ती मागणी घटणार आहे.

इचलकरंजीलाही होईल फायदा इचलकरंजीतील उत्पादित कापडाची बाजारपेठेत दर्जेदार म्हणून ख्याती आहे. त्यामुळे येथील कापड जागतिक बाजारपेठेत रूजू झाल्यास कायमस्वरूपी उत्पादनाच्या मागण्या मिळून येथील वस्त्रोद्योगाला झळाळी प्राप्त होऊ शकते. त्यासाठी बांगलादेशातील परिस्थितीचा व्यावसायिक फायदा होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाने आयात-निर्यात धोरणात तत्काळ किमान तात्पुरता बदल करून शिथिलता दिल्यास नक्कीच देशातील व राज्यातील वस्त्रोद्योजक संधीचे सोने करून घेण्यासाठी पुढाकार घेतील. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ठ राज्य वस्त्रोद्योग महामंडळ

बांगलादेशातील मोठ्या प्रमाणात असलेले गारमेंट व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे तयार कपड्यांची मागणी वाढणार असल्याने गारमेंट व्यवसायाला चालना मिळू शकते. - विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

टॅग्स :वस्त्रोद्योगबांगलादेशचीनकापूसइचलकरंजीबाजारभारत