नामदेव मोरेनवी मुंबई: देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या वर्षीपासून आंब्यावर यूआयडी बारकोड बसवण्यात येणार आहेत.
त्यानुसार मुंबई बाजार समितीमध्ये बारकोड असलेल्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी असे २०० डझन आंबा दाखल झाला असून, यामुळे आता ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.
कोकणामध्ये उत्पादन होणाऱ्या आंब्याला हापूस ही ओळख आहे. परंतु, बाजारपेठेमध्ये कर्नाटकचा आंबाही देवगड हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केला जातो.
देवगड हापूस आंबा कोणता आणि दक्षिणेकडील राज्यातून येणारा हापूससदृश आंबा कोणता? हे ग्राहकांना ओळखता येत नाही, बॉक्सवरील नाव पाहून ग्राहकही आंबा खरेदी करतात.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा प्रकार टाळण्यासाठी देवगडमधील हापूस आंब्यावर यूआयडी बारकोड बसविण्यास सुरुवात केली आहे.
आंबा उत्पादक संजय वेलणकर यांनी बारकोड असलेला आंबा गुरुवारी मुंबई बाजार समितीमध्ये पाठवला आहे.
५० लाख बारकोड स्टिकरचे वितरणदेवगडमध्ये संघटनेच्या माध्यमातून ५० लाख बारकोड स्टिकरचे वित्तरण करण्यात आले आहे. या स्टिकरवर स्कॅन केल्यानंतर आंब्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून देवगड हापूसची खरी ओळख लक्षात येणार आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये युआयडी बारकोड असलेला देवगडचा आंबा दाखल झाला आहे. बारकोडमुळे देवगड हापूस ओळखणे सहज शक्य होणार आहे. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर