चालू वर्षी पावसाळा दमदार नाही. परतीचा पाऊसही चांगला होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे संभाव्य पाणी-चाराटंचाई भेडसावून भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शासन अलर्ट झाले आहे. चाराटंचाई झाली तर त्यावर मात करण्यासाठी ओला चारा शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील सुमारे ७०० शेतकरी सव्वाशे हेक्टरवर चारा पीक घेण्यास तयार झाले आहेत. हिरव्यागार पट्ट्यात चारा कमी पडू नये, यासाठी कृषी, पशुसंवर्धन विभाग सक्रिय झाला आहे.
पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके वाळू लागली आहेत. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती बिकट होणार आहे. याची दखल घेत संपूर्ण राज्यात सरकारने चाराटंचाईवर मार्ग काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
खरीप हंगामातील नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून कृषी विभागाचे कृषी सहायक गावपातळीवर ठाण मांडून बसले आहेत. प्रगतिशील, उपक्रमशील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत चारा लागवड करण्यासाठी आवाहन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या तसेच अन्य विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदेश पाठवून चारा लागवड करण्याचे आवाहन केले जात आहे.
त्यानुसार इच्छुक शेतकऱ्यांची संख्या व क्षेत्र यांची माहिती कृषी विभागाने वरिष्ठ कार्यालयाला कळविली आहे. मका, ज्वारी, बाजरी यांचे बियाणे, गवतवर्गीय चारा याची लागवड करण्यात येणार आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणीच हा प्रयोग करण्यात येणार आहे.
हातकणंगले तालुक्यात १ लाख १२ हजार ४९३ इतकी पशुधन संख्या आहे. पावसाची स्थिती पाहता चाराटंचाई जाणवणार आहे. त्यावर उपाय म्हणून अनुदानावर चायाचे बियाणे देण्यात येणार आहे. - डॉ. रवींद्र जंगम, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, हातकणंगले
लाटवडे, कुंभोज, पाडळी, तळसंदे घुणकी, मुडशिंगी, बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, रुकडी, माणगाव या गावांत चारा लागवडीसाठी जास्त शेतकरी इच्छुक आहेत. इतर गावांतही क्षेत्र वाढावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत. - अभिजित गडदे, तालुका कृषी अधिकारी