नारायण चव्हाण
सोलापूर : बागायती पिकासाठी युरियाच्या अतिवापराचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरियामधील नायट्रेट पाण्याच्या श्रोतातून मानवी शरीरात गेल्याने आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत बनले आहे.
शेती पिकासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. विशेषतः युरिया खतामुळे शेती उत्पन्नात वाढ होते हा समज शेतकऱ्यांना त्याच्या अतिवापराकडे घेऊन जात आहे.
युरियाबरोबर अन्य रासायनिक खतांचाही बेसुमार वापर होत असल्याने समृद्ध शेतीच्या नावाखाली आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते.
युरियामधील नायट्रेट नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिकांतून पाण्यात मिसळले जाते. पिण्याच्या पाण्यातील नायट्रेट शरीरात गेल्याने आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
युरियाचा बेसुमार वापर
उसाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. त्याखालोखाल केळी, द्राक्षे आणि भाजीपाला पिकांसाठी सर्रास युरियाचा वापर होतो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६.५० ते ७ लाख टन युरिया वापरला जातो. पिकासाठी वापरलेली ही वरखते पाण्याच्या स्रोतात मिसळली जातात.
आरोग्यास घातक?
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या, गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत गंभीर आजार निर्माण करू शकते. दूषित पाण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. (जसे श्वसनाचे आजार, रक्तात गुठळ्या होणे.)
नायट्रेटचे वाढते प्रमाण
पिण्याच्या पाण्यात युरियातील नायट्रेट मिसळले जाते. या पाण्यात नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रति लिटर ४५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. मात्र, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ६० ते ८० मिलीग्रॅम प्रतिलिटर नायट्रेटचे प्रमाण सर्रास जलस्रोतातून दिसून येते.
युरियाचा वापर वाढल्याने विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी वरखते टाळून नॅनो युरियाचा वापर करायला हवा. नॅनो युरियातील नत्राच्या अति सूक्ष्म कणांमध्ये केवळ २० टक्के नत्र असते. यातील कोणताही घटक पाणी, हवा किंवा जमिनीत मिसळत नाही. मात्र, नॅनो युरिया, नॅनो डीएपी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. - डॉ. चनगोंडा हवीनाळे, द्राक्ष उत्पादक
दरवर्षी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची एक वेळा रासायनिक तर दोन वेळा जैविक तपासणी केली जाते. या वर्षी १०,२१९ पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली. त्यातील २५ स्रोत नायट्रेटबाधित आहेत. ५० टक्के स्रोत हातपंप असून, हे पाणी पिण्यास वापरले जात नाही. - अमोल जाधव, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन
अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर