बाबासाहेब काळे
साखर कारखाने सुरू झाले की, उसाची तोडणी करण्यासाठी शेतशिवारात ऊसतोड मजुरांची लगबग असायची. मात्र, आता दरवर्षी ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालल्याने ऊसतोडणीला पर्याय म्हणून हार्वेस्टर यंत्र आले आहे. त्याद्वारे उसाची तोडणी होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना मिळणारा हिरवा चारा अर्थात उसाचे वाढे मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
लातूर जिल्ह्यातील मांजरा पट्टा भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांचे ऊस हेच प्रमुख पीक असल्याने येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. गळीत हंगामात येथील पशुपालक दुभत्या जनावरांसाठी उसाच्या वाढ्याचा हिरवा चारा म्हणून वापर करतात.
पूर्वीपासून ऊसतोड मजुरांमार्फत उसाची तोड होत असल्याने चार-पाच महिने उसाचे वाढे सहज उपलब्ध व्हायचे. त्यामुळे जनावरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवत नव्हती. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने आता ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र आले आहे. यंत्राद्वारे कमी वेळात ऊसतोड होऊ लागल्याने कारखान्याला आवश्यक ऊसपुरवठा होत आहे. दरवर्षी ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालली आहे.
त्यामुळे उसाची तोडणी करण्यासाठी यंत्राचा पर्याय सर्वच कारखाने अवलंबित आहेत. यंत्राद्वारे उसासोबत वाढ्याचेही तुकडे होत असल्याने उसाचे वाढे दुर्मीळ होताना दिसून येत आहे. आता येथून पुढे पावसाळा सुरू झाल्यावरच हिरवा चारा उपलब्ध होईपर्यंत पशुपालकांना दुभत्या जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
ऐन उन्हाळ्यात हिरवा चारा मिळत नसल्याने सरकी पेंड, हरभ-याचे गुळी, ज्वारीचा कडबा आदींवरच जनावरांची गुजराण करावी लागणार आहे. हिरवा चाऱ्याअभावी दूध उत्पादनात घट येण्याचे चिन्ह आहेत. पुढील काळात पूर्ण क्षमतेने उसाची तोडणी हार्वेस्टर यंत्राद्वारे होणार असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना हिरवा चारा म्हणून मिळणारे उसाचे वाढे मिळणार नसल्याचे चित्र आहे.
सहज मिळणारे उसाचे वाढे मिळेना ... पूर्वी ऊसतोड मजूर उसाची तोड करायचे, त्यामुळे शेतकऱ्याजवळ विक्रीसाठी वाढे असायचे. आता यंत्राद्वारे ऊसतोड होत असल्याने उसासोबत वाढ्याचाही चुराडा होत आहे. त्यामुळे जनावरांना उसाचे वाढे आता मिळेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांना चारा आणायचा कोठून, असा प्रश्न येथील पशुपालकांना पडला असल्याचे ज्ञानेश्वर काळे, देवानंद कांबळे, राजाभाऊ काळे, तुकाराम देडे यांनी सांगितले.
कमी वेळेत होतेय ऊसतोडणी ...आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर यंत्र आले आहे. यंत्राद्वारे कमी वेळात ऊसतोड होऊ लागल्याने कारखान्याला आवश्यक ऊसपुरवठा होत आहे. दरवर्षी ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे उसाची तोडणी करण्यासाठी यंत्राचा पर्याय सर्वच कारखाने अवलंबित आहेत. लातूर तालुक्यातील विविध भागात सध्या यंत्राद्वारे ऊसाची तोडणी करण्यात येत आहे.