Join us

विमा कंपनींच्या हरकतीमुळे पीकविमा 'अग्रिम'ला अडचण; काय आहेत हरकती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2023 2:53 PM

दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असतानाही विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा अग्रीमपासून अजूनही वंचित राहिले आहेत.

प्रमोद सुकरेशेती व्यवसाय हा आजही मोठ्या प्रमाणावर लहरी निसर्गावरच अवलंबून आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने यंदा एक रुपयात पीकविमा योजना राबवली. बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यात सहभागही घेतला; पण दुष्काळामुळेखरीप हंगामातील पिके वाया गेली असतानाही विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा अग्रीमपासून अजूनही वंचित राहिले आहेत. राज्यातील इतर अनेक जिल्ह्यात मात्र अग्रीम देण्यात आले आहे; पण या तीन जिल्ह्यात यामुळे उतरलेल्या विम्याचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

खरंतर यापूर्वीही पीकविमा योजना होती; पण विमा उतरताना संपूर्ण हप्त्याची रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांनाच भरावी लागत होती. त्यामुळे शेतकरी वर्ग याकडे फारसे लक्ष देत नव्हता; पण यावर्षी शासनाने एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. याबाबत अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूदही केली. शिवाय महसूल व कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधनही चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे यंदा तुलनेने शेतकऱ्यांनी पीकविम्याला जादा सहभाग नोंदवला. तसेच यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांनाही या पीकविम्याचे महत्त्व समजले असे म्हटले तर वावगे ठरत नाही.

यंदाची दृष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने सुरुवातीला राज्यातील ४० तालुके दुष्काळी जाहीर केले. पुन्हा सरासरी ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडलेल्या महसुली मंडळांना दुष्काळी मंडल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. राज्यात सुमारे १,०२१ मंडले दुष्काळी जाहीर केली गेली; पण खरीप हंगाम संपला आता रब्बीच्या पेरण्या झाल्या तरी संबंधित शेतकऱ्यांना उतरलेल्या पीकविम्याचा अग्रीम मोबदला काहीच मिळालेला दिसत नाही.

कशावर घेण्यात आल्या हरकतीअनेक विमा कंपन्यांनी पीकविमा उतरला आहे खरा; पण आता परतावा देताना उत्पादकता घटूनही सोयाबीन, भुईमूग, नाचणी, कांदा आदीची उत्पादने चांगली झाली आहेत. अशा त्यांनी हरकती प्रशासनाकडे घेतल्या आहेत. शिवाय केलेल्या पंचनामांवरसुद्धा त्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळेच आता हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

घोडं अडलंय कुठं?सातारा जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याची अधिसूचना काढली होती. त्यावर पीकविमा उतरणाऱ्या विमा कंपन्यांनी हरकती घेतल्या, नंतर त्याची सुनावणीही झाली. विमा कंपन्यांच्या शंकांचे निराकरण ही करण्यात आल्याचे समजते; पण आता हे सगळे प्रकरण कृषी आयुक्त्ताच्या कार्यालयात प्रलंबित दिसत आहे.

पीकविम्याचा लाभ केव्हा मिळतो?- लाभार्थ्यांनी एक रुपया भरून प्रथमतः विमा उतरविल्यानंतर लाभास पात्र होतो.- त्यानंतर पावसाळ्यामध्ये सलग २१ दिवस पाऊस न पडल्यास विम्याचा फायदा मिळतो.- पीक काढणीनंतर १४ दिवसांपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यात काढून ठेवलेल्या पिकाचे झाले तरी या विम्याचा लाभ मिळतो.- नुकसान झालेली माहिती किमान ७२ तासांच्या आत कंपनीला कळवली तरच लाभ मिळतो.अतिवृष्टी झाली अन् त्यात पिकाचे नुकसान झाले तरी विम्याचा लाभ मिळतो.

 

टॅग्स :पीक विमापीकखरीपशेतकरीसांगलीकोल्हापूरसाताराजिल्हाधिकारीदुष्काळ