Join us

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एका तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे बाकी ठिकाणी पूर्वीप्रमाणेच ई-पीक पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:20 AM

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावांत एक ऑगस्टपासून digital crop survey डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावांत एक ऑगस्टपासून डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात येणार असून, सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्याची यासाठी निवड केली आहे. एक ऑगस्टपासून खरीप पिकांचा डिजिटल सर्व्हे करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प प्रायोगिक (पायलट) तत्त्वावर राज्यात राबवीत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याची निवड करण्यात आली असून, त्या तालुक्यातील सर्वच गावांत ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे करण्यात येणार आहे.

यासाठी कोतवाल, पोलिस पाटील कृषी सहायक, ग्रामसेवक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एकाची सहायक म्हणून निवड करायची आहे. शेतकऱ्यांनी व निवडलेल्या सहायकाने डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपमधून मोबाइल अॅपद्वारे ई-पीक पाहणी नोंद करायची आहे.

राज्यातील ३४ तालुक्यांतील २८५८ गावांत डिजिटल क्रॉप अॅपद्वारे पीक नोंद करायची तर राज्यातील उर्वरित ३३४ तालुक्यांत पूर्वीप्रमाणेच ई-पीक पाहणी करायची असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. निवडलेल्या ३४ तालुक्यांतील सहायकांना ओनर्स प्लॉटनुसार मानधन देण्यात येणार आहे.

या तालुक्यांत होणार डिजिटल क्रॉप सर्व्हेपातूर (अकोला), वरुड (अमरावती), बुलढाणा, दिग्रज (यवतमाळ), रिसोड (वाशिम), फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर), बदनापूर (जालना), लोहारा (धाराशिव), मुखेड (नांदेड), सोनपेठ (परभणी), वडवणी (बीड), जळकोट (लातूर), औंढा नागनाथ (हिंगोली), अंबरनाथ (ठाणे), तळसरी (पालघर), लांजा (रत्नागिरी), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), वाडसा (गडचिरोली), आमगाव (गोंदिया), सिंदवाही (चंद्रपूर), काटोल (नागपूर), साकोली (भंडारा), कारंजा (वर्धा), श्रीरामपूर (अहमदनगर), भुसावळ (जळगाव), सिंदखेडा (धुळे), देवळा (नाशिक), तळोदे (नंदुरबार), गगनबावडा (कोल्हापूर), दौंड (पुणे), खंडाळा (सातारा), पलूस (सांगली), दक्षिण सोलापूर (सोलापूर)

जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील ९० गावांत पोलिस पाटील व कोतवालांच्या साहाय्याने डिजिटल क्रॉप सर्व्हे एक ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राचे अॅप येणार असून प्रत्यक्ष पिकांत जाऊन अक्षांश-रेखांशासह फोटो काढला तर त्यात संपूर्ण पिकाचा नकाशा तयार होईल. पडीक जमीन, झाडे, शेततळे, घर, गोठा टिपला जाणार आहे. विमा व पीक नुकसानीसाठी हे अॅप शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. - किरण जमदाडे, तहसीलदार, द. सोलापूर

टॅग्स :पीकखरीपशेतीसोलापूरसरकारराज्य सरकारशेतकरी