देशात पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून हरिसाल २०१६ मध्ये हे संपूर्ण गाव मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आले. राज्य शासनाने डिजिटल हरिसालसाठी एका खासगी कंपनीला सीएसआर फंड उभारून दिला. मात्र, आता 'ना वाय-फाय, ना डिजिटल सेवा' सर्व काही भकास असे चित्र आहे.
आज केवळ डिजिटल हरिसालची आधारशिला उभी असून, लाखोंचा निधी वाया गेल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. राज्य शासनाने सीएसआर फंड उभारून हरिसाल येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देत डिजिटल व्हिलेजची कामे करण्यात आली होती.
त्यावेळी हरिसाल आणि परिसरातील नागरिकांना डिजिटल व्हिलेजमुळे रोजगार, इंटरनेट सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता अशा अनेक सुविधा उपलब्ध होणार असल्याची खात्री व आशा होती; पंरतु ते दोन वर्षातच मातीमोल होऊन पूर्णतः बंद झाले.
तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसीन सेवा सुरू होती. त्यांचा फायदा नजीकच्या सुमारे २५ गावांच्या नागरिकांना मिळत होता. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी हैद्रराबाद अथवा मुंबई येथील डॉक्टरांसोबत संवाद साधून उपचार करण्यात येत होता.
जि.प. शाळेत डिजिटल क्लासरूम सुरू करून विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण प्रारंभ करण्यात आले होते. हरिसाल येथे २४ तास मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. कॅशलेस सुविधा, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल हरिसालअंतर्गत मोबाइल टॉवर उभारण्यात आले होते.
ग्रामपंचायत हरिसाल येथे ८ ते १० लाख रुपये खर्च करून शुद्ध पाण्याचे यंत्र (आरओ) बसविण्यात आले होते. अशी अनेक सुविधा हळूहळू उपलब्ध करून देण्यात आली होती; परंतु त्या सर्व हरिसालमधील आरओ प्लांटदेखील असा बंद पडला आहे. सेवासुविधांना दोन वर्षांतच खासगी कंपनीने तिलांजली देत काढता पाय घेतला. आता डिजिटल व्हिलेज हरिसाल केवळ नावापुरतेच राहिले आहे.
डिजिटल हरिसाल अभिशाप म्हणून नावापुरते
आता फक्त हरिसाल डिजिटल अभिशाप म्हणून नावापुरते राहिलेले आहे. ८ वर्षापासून नावापुरते मोबाइल टॉवर उभे असून 'टू-जी सुविधा उपलब्ध आहे, तीसुद्धा चालत नाही.
इंटरनेट सुविधा, मोबाइल फोन, वाय-फाय, डिजिटल सुविधा उपलब्ध होत नसून अनेक समस्या हरिसाल व परिसरातील नागरिकांना सहन कराव्या लागत आहे. या गंभीर विषयाकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची ओरड ग्रामस्थांची आहे.
देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून हरिसाल नावारूपास येणार असल्याचा मोठा आनंद होता. केंद्र व राज्य शासनाची यंत्रणा गावात येत असल्याने तरुणाईला रोजगाराची मोठी आशा होती. मात्र, ही आशा दोन वर्षांत फोल ठरली आहे. डिजिटल सुविधांसाठी नेमलेली खासगी कंपनी गायब झाली आहे. ही हरिसाल गावासाठी शोकांतिका ठरली आहे. - विजय दारसिंबे, सरपंच, हरिसाल