Join us

साखर उद्योगातील शिस्त, व्यवस्थापन आणि नव्या आव्हानावर होणार चर्चा! साखर परिषदेचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 11:08 AM

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून या परिषदेचे आणि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

पुणे : येणाऱ्या काळातील साखर उद्योगातील आव्हाने, नवे तंत्रज्ञान, आर्थिक व्यवस्थापन, नवे वाण, शिस्त यावर चर्चा करण्यासाठी उसावर संशोधन करणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १२ ते १४ जानेवारी रोजी पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयात होणार असून शेतकऱ्यांना प्रदर्शन आणि उस प्रात्यक्षिक पाहता येणार आहे. 

दरम्यान, या परिषदेतील तांत्रिक सत्रांमध्ये ग्रीन हायड्रोजन, साखर उद्योगातील अभियांत्रिकी व प्रक्रिया, बायोइथेनॉल आणि साखर कारखान्यामध्ये पर्यावरणीय स्थिरता याविषयी सादरीकरण होणार आहे. तसेच कृषी सत्रांमध्ये ऊस जातींची निर्मिती, शाश्वत जमीन सुपीकता, आधुनिक सिंचन पद्धती, ऊस पिकाला पूरक असे शर्कराकंद, जिवाणू खते, रोग आणि किडींचे व्यवस्थापन, आधुनिक लागवड पद्धत यावर चर्चा होणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी विद्यापीठाचे प्राध्यापक, भारतीय कृषी विज्ञान परिषदेचे शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी इ. साखर उद्योगातील तांत्रिक आणि कृषी विषयांचे एकूण २१२ संशोधन लेखांचे भित्तीपत्रकांच्या माध्यमातून सादरीकरण करणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये देश विदेशातून एकूण २७३ प्रायोजकांनी सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर फिलिपाईन्स, थायलँड, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अर्जेंटिना, श्रीलंका, व्हिएतनाम, आयर्लंड, ओमान, नायजेरिया, युके, नेदरलँड, जर्मनी, इटली, नॉर्वे, डेन्मार्क, टांझानिया, जपान, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, बेल्जियम, चीन, स्वीडन, सौदी अरेबिया, फिजी आणि मालावी या २७ देशातून नामवंत तज्ञ आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनामध्ये साखर उद्योगातील देश विदेशातील साधारणतः २५०० उद्योजक, नामवंत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.

साखर कारखाने, आसवनी, सहवीज प्रकल्पांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे उत्पादक, शेतकऱ्यांसंबंधित कृषी अवजारे, बियाणे, कृषी निविष्व उत्पादक कंपन्यानी विकसित केलेले नवनवीन तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामध्ये २ प्राईम, ११ कॉन्फरन्स, ३२ प्लॅटिनम, ५ द्वयमंड, १६ गोल्ड आणि ६२ सिल्व्हर प्रायोजक असून ३मीx३मी चे ८१ स्टॉल व २मीx२मी चे ४० स्टॉल आणि १२ ओपन व १२ विद्यापीठ आणि संस्था स्टॉल आहेत. तसेच या परिषदेमध्ये कृषी विद्यापीठे, साखर उद्योगाशी निगडित संस्थासुद्धा नवनवीन तंत्रज्ञान प्रदर्शित करणार आहेत. या प्रदर्शनामध्ये हार्वेस्टर, प्लांटर, सोलर पंप आणि ब्रेन सारख्या अत्याधुनिक मशिनरी बघावयास मिळणार आहेत. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करण्याची संधी साखर उद्योगांना आहे आणि याच अनुषंगाने संस्थेमार्फत ग्रीन हायड्रोजन निर्मितीचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प बघावयास मिळणार आहे.

तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमाद्वारे ऊस शेतीमध्ये प्रसारित ऊस जाती, त्रिस्तरीय बेणे मळा, आंतरपीक पद्धती, शर्करा कंदाची लागवड, आधुनिक पद्धतीने ऊस लागवड तंत्रज्ञान, उस उत्पादनाचे अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर, उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपांची लागवड, ऊस पिकामध्ये जिवाणू खतांचा वापर, वसंत ऊर्जेचा वापर, ठिबक सिंचन, रेन गण पध्दती, एकात्मिक ब्या, रोग आणि किडींचे व्यवस्थापन इ. विषयांवर ९६ थेट प्रात्यक्षिके अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रमाणित हे पद्धतीने प्रक्षेत्रावर पहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर क्षारपड जमीन सुधारणा आणि मृदा परीक्षणाची शास्त्रीय पद्धत याविषयावर प्रत्यक्ष कृती प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रदर्शन व ऊस प्रात्यक्षिके पाहण्यासाठी शेतकरी, उद्योजक, अभियांत्रिकी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी इत्यादींना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊससाखर कारखाने