सचिन सागरे
मुंबई : पश्चिमेकडील चिकणघर राममंदिर परिसरात असेमोनिया प्रजातीमधला एक कोळी याच ठिकाणी राहणाऱ्या सोमनाथ कुंभार या तरुणाला काही दिवसांपूर्वी सापडला आहे. त्यावर त्याचे सध्या संशोधन सुरु आहे. या प्रभागात देशी झाडांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने पक्षी, कीटक यांचा जास्त प्रमाणात वावर दिसून येतो. त्याचबरोबर जैविक विविधता अनुभवास मिळते. आणि, म्हणूनच ह्या परिसरातील तो लहानसा भाग सोमनाथसाठी एखाद्या नॅशनल पार्कपेक्षा कमी नाही.
अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवल्यानंतर सोमनाथने छंद म्हणून फोटोग्राफी करायला सुरुवात केली. सुरुवातीला मोबाईलवर त्याने विविध फोटो काढण्यास सुरवात केली. मात्र, म्हणावे तसे फोटो त्याला टिपता येत नव्हते म्हणून त्याने एका भंगार दुकानाकडे वाट वळवत तेथून जुन्या कॅमेऱ्याची लेन्स विकत आणली. या लेन्सच्या सहाय्याने मायक्रो फोटोग्राफी करायला सुरुवात करत 2016 पासून कोळी, कीटक यांचे मायक्रो फोटो काढायला लागला. रामबाग परिसरात असलेल्या झाडांवर असणारे विविध कीटकांचे फोटो सोमनाथ काढू लागला. 2018 मध्ये याच परिसरात सोमनाथला ‘फिन्टेला चोलकी’ या नव्या प्रजातीचा शोध लागला. त्यानंतर, एके दिवशी खिडकीत बसलेल्या सोमनाथला एक नवीन प्रकारचा कोळी दिसून आला. त्याने लगेचच आपला कॅमेरा उचलत त्या कोळ्याची छबी टिपायला सुरुवात केली. फोटो काढल्यानंतर पुन्हा एका नव्या प्रजातीच्या कोळ्याचा शोध लागल्यानंतर सोमनाथने सन 2020 मध्ये ‘आयक्यूएस तुकारामी’ असे त्या कोळ्याला नाव दिले.
शोध निबंध तयार
कोळ्यांच्या प्रजातींवर काम करणाऱ्या सोमनाथचे शोधनिबंध जुलै 2021 मध्ये रशियन जर्नल अर्थोपोडा सिल्केटामधून प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच, मार्च 2019 मध्ये युएसए जर्नल पेक खामियामधून जम्पिंग स्पायडर (उड्या मारणारा कोळी) यावर फिल्ड नोट बनवली. ज्यामध्ये कोळी किटकाचा दिवसा व रात्रीचा वावर, त्याची फीडिंग करण्याची पद्धती, खाण्यातील गोष्टी, जाळे बनविण्याची पद्धती यावर शोध निबंध तयार केला होता. काही दिवसांपूर्वी चिकणघर येथील राममंदिर परिसरात असेमोनिया प्रजातीमधील एक कोळी सोमनाथला सापडला असून सध्या यावर त्याचे संशोधन सुरु आहे. लवकरच हे संशोधन पूर्ण होण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
रामबाग परिसरात आढळतात हे कीटक
बुकलाईस, प्लांट होपर्स, अफिड्स, स्टीन्क बग्स, मोथ्स, फ्रुट्फाइल्स, ड्रेनफ्लाय, व्हाईट फ्लाय, हॉवर फ्लाय, हनी बी, लींफकटर बी यासारखे अनेक कीटक आणि त्याच्या विविध प्रकारच्या प्रजाती तसेच लहानसहान कीटक रामबाग परिसरात आढळून येतात. तिथे कोळ्यांना आणि पक्षांना पुष्कळ प्रमाणात खाद्य उपलब्ध होत असल्याने तिथे जैविक विविधतेत वाढ होत आहे. विशेषतः त्याला फोटो हि काढण्याची आवड आहे. मोबाईलच्या सहाय्याने फोटोग्राफी करता यावी म्हणून सोमनाथला लेन्स बनविण्याचा देखील छंद आहे. त्याने तयार केलेल्या या लेन्सची फोटोग्राफर तसेच, मायक्रो फोटोग्राफी करणाऱ्यांकडून मागणी होत आहे.