संजय खाकरे
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने परळी येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत.
शेतीविषयक अवजारे मशनरी, खते, बी-बियाणे, महिला बचत गट दालन, कृषी विद्यापीठाचे स्टॉल असे एकूण ४३४ स्टॉलला भेट देण्यासाठी प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी होती. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनीही कृषी प्रदर्शनास भेट दिली.
बीड जिल्ह्यात सध्या ड्रोनची चर्चा चालू असताना कृषी महोत्सवातही वेगळ्या ड्रोनची हवा पाहायला मिळाली. शेतीच्या फवारणीसाठी अत्याधुनिक कृषी विमान ड्रोन परभणीच्या कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहे.
याचे प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना दाखविण्यात येत आहे. तसेच यावेळी रेशीम शेती व्यवस्थापन, पशुधनाचे महत्त्व, उत्ती संवर्धन रोपे, भाजीपाला संरक्षण शेती आदी विषयांवर चर्चासत्र झाले.
आज समारोप
२६ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे. समारोप समारंभास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, सीईओ संगीता देवी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.