Join us

"आमच्याकडे काय आहे यापेक्षा शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे याची चर्चा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 8:12 PM

शेतकरी हा एकटा नाही. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नुकसानीपासून वाचवण्यासाठी कृषी विद्यापीठ सोबत आहे असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी व्यक्त केले.

Pune : सध्या मराठवाड्यातील काही भागात जास्त पाऊस झाल्याने खरिपातील सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. पण यातून रब्बी पिकांची पेरणी लवकरात लवकर होईल, उपलब्ध ओलाव्यावर रब्बी ज्वारी, हरभरा या पिकाची पेरणी होईल ही एक चांगली संधी म्हणावी लागेल. शेतकरी हा एकटा नाही. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नुकसानीपासून वाचवण्यासाठी कृषी विद्यापीठ सोबत आहे असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी यांनी व्यक्त केले.

संभाजीनगर येथे पैठण रोडवरील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात ७६वी रब्बी विभागीय संशोधन व विस्तार  सल्लागार समितीची बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना आपण एकटे आहोत असे वाटू नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या कृषी विस्तार कार्याच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. आम्हाला जे माहीत आहे ते सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशाची आवश्यकता आहे याची त्यांच्यासोबत चर्चा करून ते तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. सोयाबीन पीक  हे काढणी खर्च विचारात घेता सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही. दुसरे मोठे हार्वेस्टर हे छोट्या शेतकऱ्यांना आणि पाऊस पडल्यावर शेतात उपयोग करणे अडचणीचे असते. आपण कापूस पिकास पर्याय म्हणून सोयाबीन पिकाकडे वळलो आहोत, पण या पिकांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर पर्यायी पीक पद्धती सूचीत करावी लागेल आणि म्हणून या पिकाच्या समस्या सोडविण्यासाठी विचार व्हावा असे मत भागडे यांनी व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व  संशोधन  परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे , संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग , संचालक विस्तार शिक्षण डॉ. बी. व्ही, आसेवार , एम.सी.ए.ई.आर.चे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगरचे डॉ. तुकाराम मोटे, लातूर प्रतिनिधी म्हणून श्री. आर. टी. जाधव, आयोजक तथा सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार आदी मंडळी उपस्थित होते.

या उद्घाटन सत्राचे संचालन डॉ सूरेखा कदम यांनी केले.या  बैठकीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे  विभाग प्रमुख, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, कृषि विस्तार सेवेतील कृषि शास्त्रज्ञाची उपस्थिती होती.कृषि विभागाकडून  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागिय कृषि अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीक