Join us

सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; असे करा व्यवस्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 2:43 PM

बुलढाणा जिल्ह्यातील काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा ...

बुलढाणा जिल्ह्यातील काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. 

यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. 

जिल्ह्यात सतत रिमझिम पाऊस होत असल्याने पिकांवर विविध अळींचा प्रादुर्भाव होत आहे. शिवाय नियमित ढगाळ वातावरण राहत असून, सूर्यदर्शन होत नसल्याने अन्नद्रव्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडण्याची अधिक शक्यता बळावते किंवा वाढ कमी होते. 

अनेक ठिकाणी सोयाबीन पेरणी पूर्ण होऊन पिके ४० ते ४५ दिवसांची झाली आहेत. वाढीच्या सुरुवातीलाच सोयाबीन पीक पिवळे पडत असेल तर ते प्रामुख्याने अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आणि शेवटच्या अवस्थेत पिवळे पडत असल्यास ते विषाणूजन्य रोगामुळे असा ठोकताळा बांधता येतो. 

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे शोषण होत नसल्यामुळे सोयाबीन पिवळे पडते. चुनखडीयुक्त जमिनीचा पीएच वाढतो. वाढलेल्या पीएचमध्ये काही अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. 

चुन्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश, मँगेनीज, जस्त, तांबे, मॅग्नेशियम आणि लोह यांच्या उपलब्धतेवर परिणाम होतो. सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने गंधक, जस्त आणि लोह यांची कमतरता असल्याने पीक पिवळे पडते. गंधक कमी पडल्यास पानामध्ये हरित द्रव्य १८ टक्क्यांपर्यंत कमी तयार होते.

असे करा एकात्मिक व्यवस्थापन

* सोयाबीनवर पिवळा मोझेंक, मोझेंक या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमार्फत होतो. रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. पिकांमधील व बांधावरील तणांचे नियंत्रण करावे.* सोयाबीन पिकात आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते. पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे चिकट सापळे (१५ x ३० सेमी) पिकात हेक्टरी १० ते १२ प्रमाणे लावावेत. * विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी व मावा या किडींद्वारे होत असल्याने या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड १७.८ टक्के एस. एल २.५ मि. लि. किंवा फ्लोनिकामिड ५० टक्के डब्ल्यू जी ३ ग्रॅ. किया थायामिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

उपाययोजना काय कराल?

* सोयाबीन पिवळे पडत आल्यास विद्राव्य खतांची फवारणी करावी. हे प्रमाण प्रति लिटर पाण्यात करावी. * नत्र अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास युरिया २० ग्रॅम द्यावा, गंधक अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सल्फेट युक्त खत ५ मि.लि., लोह व जस्त अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये २ (मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड-२) ५ मि.लि. किंवा चिलेटेड फेरस ५ ग्रॅम आणि चिलेटेड झिंक ५ ग्रॅम प्रमाणात द्यावे. * स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास १२:६१:० किवा १७:४४:० किवा ०:५२:३४ खत ५ ग्रॅम द्यावे. बोरॉन अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये २ (मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड-२) ५ मि.लि. द्यावे.* कमतरता लक्षात येत नसल्यास, १९:१९:१९ खत १०० ग्रॅम किंवा अमोनियम सल्फेट २०-२५ ग्रॅम किंवा झिंक चिलेटेड २५ ग्रॅम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य २५ मि.लि. अधिक अमिनो अॅसिड यांची फवारणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेती