Join us

'कृषी'साठी जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर; पुण्यात तयार होणार ६ नगदी पिकांचे क्लस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:17 IST

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी महाविद्यालयात पिकांच्या क्लस्टर निर्मितीची तिसरी बैठक पार पडली.

Pune : पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी आता अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी जिल्ह्यातील ठराविक शेतपिकांची निवड करून त्यांचे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पिकांखालील क्षेत्र वाढवणे, पिकाची उत्पादकता वाढवणे, नवे वाण वापरात आणणे, निर्यातक्षम मालाची निर्मिती करणे असे उद्दिष्ट्ये ठरवण्यात आलेली आहेत. पुढील पाच वर्षांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी महाविद्यालयात पिकांच्या क्लस्टर निर्मितीची तिसरी बैठक पार पडली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता महानंद माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, पुणेचे आत्मा प्रकल्प संचालक सुरज मडके, पुणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, पुण्यातील तालुका कृषी अधिकारी, संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी, निर्यातदार, प्रक्रिया उद्योजक आणि शेतकऱ्यांचा सामावेश होता. 

पुणे जिल्ह्यातील केळी, अंजीर, आंबा, मका, सूर्यफूल आणि स्ट्रॉबेरी या पिकांसाठी क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सदर पिकांवर चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना या बैठकीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सदर पिकांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रक्रिया, निर्यातीसाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. 

कसे काम केले जाणार?केळी, अंजीर, आंबा, मका, सूर्यफूल आणि स्ट्रॉबेरी या पिकांखालील जिल्हात सद्यस्थितीत असलेल्या क्षेत्रात जवळपास दुप्पटीने वाढ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुर्यफुलाचे क्षेत्र केवळ १०० हेक्टरच्या आसपास आहे. हे क्षेत्र पुढील ५ वर्षांमध्ये १ हजार हेक्टरपर्यंत, त्यासोबतच अंजिराचे क्षेत्र ६११ हेक्टरवरून २ हजार हेक्टरवर, स्ट्रॉबेरीचे क्षेत्र १३ हेक्टरवरून १०० हेक्टरवर, केळीचे क्षेत्र ५ हजार हेक्टरवर नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर आहे. 

यासोबतच मालाच्या उत्पादकता वाढ आणि निर्यातक्षम शेतमालाच्या निर्मितीसाठी SOP विकसित करण्यात येणार आहेत.  त्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. या शेतमालाच्या प्रक्रिया आणि निर्यातीसाठी मूल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून यावेळी अंजीर पिकासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, बँकेच्या मायक्रो फायनान्सचे प्रमुख अभिजीत हेगडे, शेतकरी अंकुश पवार, शेतकरी समीर डोंबे हे तर केळी पिकासाठी इंदापूर तालुक्यातील कपिल जाचक, जुन्नर तालुक्यातील अजय बेल्हेकर आणि डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतकरी, स्ट्रॉबेरी पिकासाठी आंबेगाव तालुक्यातील शेतकरी शंकर केंगळे, तेलबिया पिकासाठी बारामती अॅग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनीकडून सुनिल जगताप आणि आंबा पिकासाठी जुन्नर येथील शेतकरी भरत जाधव आणि गुलाब ढोले हे उपस्थित होते. 

आजच्या बैठकीत शेतकऱ्यांनी सुचवलेल्या समस्येवर तोडगा काढून वरील सहा पिकांच्या क्लस्टर विकासासाठी कामाला लागण्याचे आदेश जिल्हाधिकारी डुडी यांनी कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकऱ्यांना दिले आहेत. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे