मालेगाव तालुक्यासह सर्वत्र पावसाने दांडी मारल्याने सरासरीच्या ४० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. यासाठी शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करीत राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविले आहे. त्यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळू शकते.
यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा झालेला पाऊस तीन पेक्षा अधिक आठवड्याचा खंड, पाणी पातळीत घट, अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट, पिकांचे नुकसान, चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पाणीटंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आला आहे. यात मालेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसानभरपाई घेणारा तालुका ठरणार आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना बँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळू शकते. यंदा पावसाने तब्बल अडीच महिने मालेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मालेगाव तालुका महसूल मंडळाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. पंचनामा केल्याचा अहवालानुसार लवकरच शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
या पिकांची नुकसानभरपाईकापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, मूग, कांदा पिकांना नुकसान भरपाई मिळू शकते.
अशी मिळेल प्रतिहेक्टर नुकसानभरपाई पीक रुपये (प्रतिहेक्टर) कापूस ४९,५००भुईमूग ४२,९७१मका ३५,५९८ कांदा ८१,४२२ज्वारी, बाजरी ३०,०००मूग २०,०००
कोणत्या तालुक्याचा समावेशउल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी-पोंड, पुरंदर-सासवड, शिरुर-घोडनदी व वेल्हे, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा, कडेगाव, खानापूर-विटा, मीरज, शिराळा (सांगली), खंडाळा व वाई, हातकणंगले व गडहिंग्लज, छत्रपती संभाजीनगर व सोयगाव, आंबेजोगाई, धारुर व वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव व वाशी, बुलढाणा व लोणार या तालुक्याचा समावेश आहे.