आळंदी: श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळा रथासाठी निवड झालेल्या मानकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केली असून, मानाची ही बैलजोडी आळंदीत दाखल झाली आहे. दरम्यान, "हौश्या व बाजी' असे बैलांचे नामकरण करण्यात आले आहे.
यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला आळंदीतील सहादू बाबूराव कुऱ्हाडे (वस्ताद) यांच्या बैलजोडीला मान मिळालेला आहे. पालखी प्रस्थानाला तीन आठवडे अवकाश असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.
माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा येत्या २९ जूनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर कुऱ्हाडे कुटुंबीयांनी कर्नाटक राज्यातील यादवाड व नंदगाव या दोन गावातून प्रत्येकी एक-एक बैल खरेदी केला आहे. सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीची ही बैलजोडी तयार करण्यात आली आहे.
या बैलजोडीचे 'हौश्या व बाजी' असे नामकरण करण्यात आले आहे. आळंदीत ही बैलजोडी दाखल झाल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करून पूजा करण्यात आली. माऊलींचा रथ ओढण्याचे भाग्य बैलांना मिळत असल्याने आनंदी असल्याची भावना कुऱ्हाडे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
आहारात खुराक- बैलांच्या रोजच्या आहारात खुराक म्हणून उडीद डाळ, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, मका भरडा, गहू भुसा, गव्हाचे पीठ, शाळू कडबा व दूध दिले जाणार आहे.- तर गोठ्यात बैलांच्या पायाला किंवा शरीराला कुठलीही इजा होऊ नये या उद्देशाने गोठ्यात गादीदार वस्तूंचा वापर केला जात आहे.- बैलांची वैद्यकीय तपासणी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून केली जाणार असून, आवश्यक औषध लसीकरणही केले जाणार आहे.- सुमारे साडेसहा लाख रुपये किंमतीची ही बैलजोडी तयार करण्यात आली आहे.