रत्नागिरी : यंदा आंबा कलमांवर मोहर मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी फळधारणेचे प्रमाण मात्र पाच ते सात टक्केच आहे. सध्याच्या मोहरामध्ये नर मोहराचे (मेल फ्लॉवरिंग) प्रमाण अधिक आहे.
मादी मोहर (फिमेल फ्लॉवरिंग) नसल्यामुळे फळधारणा झाली नसल्याचे बागायतदार सांगत आहेत. त्यातच सततच्या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे परागीकरणाचे कार्य करणारी फुलपाखरे व कीटकांचे प्रमाण कमी होत चालल्याने फळधारणेवर परिणाम होत आहे.
यावर्षी पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला. त्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही. डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर मोहर सुरू झाला; परंतु 'फेंगल' वादळानंतर हवामानात बदल झाला.
थंडी गायब झाली, उकाडा वाढला, काही ठिकाणी पाऊसही पडला. त्यामुळे मोहर आलेल्या झाडांना पालवीही आली. काही झाडांना भरपूर मोहर आला असला तरी तो निव्वळ फुलोराच आहे. अपेक्षित फळधारणा झालीच नाही.
पहिल्या टप्प्यातील मोहर बाद होत नाही. दुसऱ्या टप्प्यातील मोहर थंडीच्या कडाक्यामुळे बाद होण्याची शक्यता असते, यावर्षी तर पिकाचे चित्रच पालटले आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत कधी थंडी, कधी मळभ, कधी उकाडा या प्रकारच्या विचित्र वातावरणामुळे तुडतुडा, फुलकिडे, उंटअळी, शेंडे पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव वाढला.
हवामानातील बदल आणि रोग यामुळे कीटकनाश फवारणीचे प्रमाण वाढले. मात्र, त्याचा परिणाम फुलपाखरे, कीटकांच्या जीवनक्रमावर होत आहे.
वेगवेगळी फुलपाखरे आणि कीटक परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र तीव्र कीटकनाशकांमुळे त्यांचे प्रमाण घटू लागल्याने फळधारणेवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी पंधरा दिवसांनी नेमके चित्र होईल स्पष्टसध्या फुलोरा अधिक असून, फळधारणा अत्यल्प आहे. अनेक बागांतील मोहर वाळून गळून पडला आहे. काही ठिकाणी अत्यल्प फळधारणा झाली असून, कणी ते सुपारी या आकाराची फळे आहेत. पहिल्या टप्यात पाच ते सात टक्केच फळधारणा आहे, यावर्षीच्या पिकाचे चित्र २० जानेवारीनंतर स्पष्ट होईल.
यावर्षी काही झाडांना आधी मोहर आला, त्याच झाडांना नंतर पालवीही आली. मोहरासाठी झाडांना लागणारी ऊर्जा पालवीकडे वर्ग झाली. त्यामुळे मोहर वाळला. त्याशिवाय काही झाडांना नर मोहर जास्त आला. त्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यामुळे फुलोरा भरपूर असला तरी फळे नाहीत. - टी. एस. घवाळी, बागायतदार