World Soil Day : माणूस जसा आपल्या शरीराची काळजी घेत असतो. शरीरावरील त्वचा मुलायम ठेवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो. मात्र दुसरीकडे आपण ज्या भूमीला आई म्हणतो. त्या भूमीची अवस्था बिकट झाली आहे. पूर्वीसारखी जमिनीची त्वचा म्हणजे माती राहिलेली नाही. माती प्रदूषण हा आता महत्वाचा विषय झाला आहे. रासायनिक खताच्या अति वापराने मातीचा मुलायमपणा निघून गेला आहे. त्यामुळे माती परीक्षण करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यासाठी मातीचा नमुना कसा आणि केव्हा घ्यावा हे समजून घेउयात.
शेतीसाठी मातीचा स्तर हा महत्वाची भूमिका बजावतो. मात्र हल्ली मातीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते. त्यामुळे मातीचे आरोग्य तपासणे आवश्यक असते. त्यासाठी मातीचा नमुना घेऊन तपासणी करावी लागते. मातीचा नमुना वर्षातून केंव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो, पंरतू शक्यतो रब्बी पिकांची काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात घेतल्यास पृथःकरण करून परिक्षण अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो. पिकाच्या काढणीनंतरच्या काही वेळेस जमिनी कोरडया असताना घ्यावा.जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल, तर खते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकांच्या दोन ओळीमधून घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खताच्या मात्रेनंतर लगेचच मातीचा नमुना घेवू नये.
मातीचा नमुना घेण्याची पध्दती
प्रथम शेतात फेरफटका मारून निरीक्षण करा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांचा रंग, वाढ भिन्नभिन्न असते, तसेच जमिनीच्या पृष्टभागावरचा रंग देखील वेगवेगळा असतो. उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते, सखल भागातील काळी असते. म्हणूनच उतार, रंग, पोत, खोली, व्यवस्थापन व पीक पध्दती नुसार विभागणी करावी, प्रत्येक विभागातून स्वतंत्र रित्या नमुना घ्यावा. सारख्या जमिनीतून नमुना घेताना काडीकचरा गवत पिकांची धसकटे व मुळे काढून टाका जिथे पिकांची उळीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओळींमधून नमुना घ्या. नुकतेच खते टाकलेल्या जमिनी खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमीन बांधाजवळील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्या जवळील जागा, शेतातील बांधाजवळचा परिसर, कंपोस्ट खतांच्या जवळपासची जागा, अशा ठिकाणांतून मातीचा नमुना घेऊ नका. सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर 30 गुणिले 45 सेंटीमीटर इंग्रजी व्ही आकाराच्या चौकोनी खड्डा करून आतील माती बाहेर काढून टाका खड्ड्याच्या दोन्ही बाजूची दोन सेमी जाडीची माती खुरप्याच्या सहाय्याने वरपासून खालपर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लास्टिकच्या बादलीत टाका, अशा रीतीने एका प्रभागातून दहा नमुने घेऊन त्याच बादली टाका.
फळबागांसाठी मातीचा नमुना कसा घ्यावा?
फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदुन पहिल्या एक फुटातील ३० सेमीपर्यंत मुरूम नसल्यास 30 ते 60 सेंमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत 60 ते 90 सेंमी पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोगशाळेत पाठवावे. ही सर्व माती एका स्वच्छ प्लॅस्टिकच्या कागदावर टाका. चांगली मिसळा, ओली असल्यास सावतील वाळवा नंतर हया ढिगाचे चार समान भाग करा. समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोनो भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा. ही प्रक्रिया एक किलो ग्रॅम माती शिल्लक राहीपर्यंत करा.
उरलेली अंदाजे एक किलो वाळवलेली माती स्वच्छ पिशवीत भरा. पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा. शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा. सर्वसाधारणपणे नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठविणे हयात दोन आठवडयापेक्षा अधिक काळ नसावा, अन्यथा माती पृथ:करण बदलण्याची शक्यता आहे. जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त-चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेंमी मधील क्षार बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी औजाराने मातीचा नमुना घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अवजारे, उपकरणे, माती नमुने घेण्यासाठी वापरू नका. नमुना स्वच्छ पिशवीत भरून सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पिशवीवर सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.