Join us

तुम्हाला माहितीय का अर्धापूर तालुक्याची नवीन ओळख; शेतकरी कोणते पिके घेतात वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 5:56 PM

अर्धापूर तालुक्याची नवीन ओळख तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर

युनूस नदाफ : 

अर्धापूर तालुक्याची ओळख केळी पिकामुळे झाली असली, तरी तालुक्यातील काही गावांची ओळख त्या गावातील पिकांवरून होत आहे. संपूर्ण तालुका केळी पिकासाठी प्रसिद्ध असला तरी खैरगाव व चाभरा हे दोन गावे निरनिराळ्या पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. 

पपईचे गाव म्हणून जिल्ह्यात खैरगाव अन् नागवेली पानमळा पिकासाठी चाभरा गावाने वेगळी छाप उमटविली आहे.तालुक्यातील खैरगाव गावाचे क्षेत्रफळ पाचशे हेक्टर आहे.

येथील सर्वच शेतकरी मागील काही वर्षांपासून पपई या पिकाची हमखास लागवड करीत आहेत. शिवाय पुढील वर्षी लागवडीसाठी जमिनीचे आणि रोपट्याचे नियोजन करून ठेवतात. यामुळे प्रत्येक वर्षी येथील शेतकऱ्यांकडे पपईची लागवड केलेली असते.

पपईच्या भरघोस उत्पादनामुळे येथील शेतकऱ्यांचे पपईचे नियोजन पाहण्यासाठी बाहेर गावातील शेतकरी भेटी देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढत चालले असून, पपईमुळे चांगले उत्पन्न मिळत असल्याने उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

मागील काही वर्षापासून शेतकरी नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडला आहे. ऐनवेळी पिकांचे नुकसान होत असल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. याचा फटका पपई व पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात बसला.

सध्या पपईला मागणी वाढली असून ३० ते ४० रुपये प्रतिकिलो भाव बाजारपेठेत मिळत आहे. पपई हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक असल्यामुळे बहुतांश नागरिक पपई खाण्यास प्राधान्य देतात. सध्या नांदेड शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर पपई विक्रेते दिसत आहेत.

येथील व्यापारी येतात....

नांदेड, हिंगोली, परभणी, हैद्रराबाद आदी ठिकाणचे व्यापारी येथील पपई खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात.

पानमळ्याचे गाव चाभरा

■ अर्धापूर तालुका म्हटले की, केळीचे पीक नजरेपुढे येते. अर्धापूर तालुक्याची केळी देशातच नाही, तर येथील केळीची चव अटकेपार गेली आहे. या गावात केळीसह गेल्या काही वर्षांपासून नागवेली पानमळ्याची लागवड केली जाते. येथील नागवेलीचे पान विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विकले जाते. नागवेलीच्या या पानांना एक वेगळी चव असून, सर्वत्र मोठी मागणी आहे.

■ नागवेली मळ्यातून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत असल्याने पानमळ्याची संख्या वाढत चालली आहे. सुरुवातीला पान खरेदी मराठवाड्यात व्यापारी येत असत. मात्र कालांतराने व्यापारी संख्या वाढली असून, आता महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून पान खरेदी करण्यासाठी व्यापारी येत आहेत.

■ चाभरा गावाला जाण्यासाठी दिवसें - दिवस व्यापारी आणि शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. एकेकाळी चाभरा गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. आता राज्य महामार्गचा चांगला रस्ता झाला असून, पानमळ्यामुळे चाभरा गावाची ओळख निर्माण झाली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीनांदेड