Join us

तुम्हाला माहिती आहेत का तांदळाच्या क्वचित आढळणाऱ्या जाती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 31, 2023 2:40 PM

बाजारात कायम मागणी नसली तरी तांदळाच्या काही क्वचित आढळणाऱ्या जातींचा राज्यात काही पदार्थांमध्ये आजही आवर्जून वापर केला जातो.

पंगतीची सुरुवात आणि शेवट करणाऱ्या भाताचं भारतात पुरातन काळापासून मोठं महत्त्व. कधी सुगंधी, आसट तर कधी मोकळा भात खाण्यासाठी मोठ्या चवीनं तांदूळ निवडला जातो. गोणीतला तांदूळ तळहातावर ठेवत त्याची गुणवत्ता तपासताना आपण कित्येकदा पाहिलेले असते. बासमती, कोलम,इंद्रायणी अशा एकाहून एक तांदळाचे प्रकार आपल्या कानावर पडलेले. बाजारात कायम मागणी नसली तरी तांदळाच्या काही क्वचित आढळणाऱ्या जातींचा राज्यात काही पदार्थांमध्ये आजही आवर्जून वापर केला जातो. या तांदळाच्या जातींविषयी तुम्हाला माहिती आहे का?

वलय (तांबडा तांदूळ)

वलय ही तांदळाची महाराष्ट्रातील क्वचित आढळणारी जात आहे. काहीसा भरड जाड स्वरूपाचा हा तांदूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात पिकवला जातो. पारंपारिक पद्धतीने पेज करण्यासाठी कोकणात हा तांदूळ वापरला जातो.  मासे, डाळ यासोबत तसेच इटालियन पदार्थ 'रिसोटो', तसेच इडली, डोसा तयार करण्यासाठी या तांदळाचा वापर केला जातो. हा तांदूळ ग्लूटनमुक्त आण  जीवनसत्व बी ६ ने समृद्ध आहे.

खडक्या

पुण्यातील जुन्नर भागातली तांदळाची ही स्थानिक जात. सुवासिक, शुभ्र पांढऱ्या तांदळाची लागवड या भागात आजही केली जाते. महिला आणि वृद्धांसाठी हा तांदूळ चांगला असल्याचे सांगितले जाते. दररोजच्या आहारात डाळ आणि रस्सा पदार्थांसोबत खाण्यासाठी लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असणाऱ्या खडक्या तांदळाचा भात लावला जातो. 

भोर तालुक्यात दरवळतोय नव्या इंद्रायणीचा सुगंध

काळभात

सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यातली ही स्थानिक जात. काळ्याभोर ओंब्या असणारा हा चविष्ट रूचकर तांदूळ. गावोगावी फिरूनही या वाणाचं शुद्ध बियाणं मिळणं तसं दुरापास्त झालंय. चवीला रूचकर असला तरी सुवासिक श्रेणीतही तो मोडला जातो. काळभात तांदूळ आदिवासी भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष लागवड करताहेत. देशी वाण असणाऱ्या या हातसडीच्या तांदळाला आरोग्यदायी मानले जाते.

रायभोग

तांदळाची ही दूर्मिळ जातही सह्याद्रीच्या कुशीतीलच. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले गावात हा तांदूळ सापडतो. तशी स्थानिकच जात, पण क्वचित आढळणारी. या भागातील आदिवासी समाज या वाणाची लागवड करतात. तसे या भागात डोल, रायभोग, चिमणसाळ, जिरवेल, लाल भात या जातीही घेतल्या जातात. दररोजच्या जेवणात डाळ, रस्सा यासोबत खाण्यासाठी किंवा घरी खाण्यापुरतीच या वाणाची लागवड होत असल्याने बाजारात हे वाण फारसे दिसत नाही.

सरकारचा 'भारत' ब्रँडचा तांदूळ आता मिळणार २५ रुपये किलो!दफ्तरी

मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील भाग म्हणजे भाताचे आगार. ऊस आणि भात ही प्रमुख पिके. पाण्याने समृद्ध प्रांत. परिणामी, भात पिकासाठी लागणारी नैसर्गिक अनुकुलता अधिक. दफ्तरी ही येथील स्थानिक जात. नाशिक, कोल्हापूरच्या पन्हाळा भागात या भाताची लागवड होते. हा तांदूळ दिसायला तांबूस तांबड्या रंगाचा. 'ब्राऊन राईस' या पंगतीत जाऊन बसणारा. पण या भागातलं हे देशी वाण. मोकळा भात करण्यासाठी या भागात दफ्तरी वापरला जातो. तशा स्थानिक इंद्रायणी, अवनी, शुभांगी, सोनम अशा अनेक जाती या भागात आहेत. पण दफ्तरी रोजच्या आहारात वापरला जातो. लागवड आणि मागणी कमी असल्याने हे वाणही फारसे पहायला मिळत नाही. पुलाव, बिर्याणी याकरताही या तांदळाला पसंती मिळते.

नागली, वरई, खुरासणी पिके झाली दुर्मिळ

वैदिक तांबडा तांदूळ

पार आणि दमन गंगेच्या खोऱ्यातली ही स्थानिक जात. भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि ॲन्टीऑक्सिडन्ट गुणधर्माने वैदिक तांबडा तांदूळ ओळखला जातो. हे वाण आजारी, गर्भवती महिलांसाठी पौष्टीक समजले जाते. नावातच या तांदळाचे वैशिष्ट्य ठळक होते. तांबडा आणि काहीसा भरड प्रकारातील या तांदळाचे वाण फारसे उपलब्ध होत नाही. ब्राऊन राईस श्रेणीतील तांदळासारखाच हाही तांदूळ क्वचित बाजारात दिसतो.

आंबेमोहर तांदूळ

खवैय्यांच्या विशेष पसंतीचा आणि सुगंधी तांदळाचा राजा समजला जाणारा आंबेमोहर तांदूळ हा मावळ प्रांतातला. अखूड, जाड आणि सुंगधी ही त्याची वैशिष्ट्ये. सह्याद्रीच्या डोंगर कपारींमधील आंबेमोहरचे होणारे उत्पादन पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, कामशेत येथे मोठ्या प्रमाणावर होते. मावळ प्रांतात घेतले जाणारे हे देशी वाण आता हळूहळू या भागात कमी घेतले जाऊ लागले आहे. मुळ महाराष्ट्राचे असणारे हे वाण महाराष्ट्रात कमी आणि मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश तेलंगणातून अधिक येत आहे.आंबेमोहर तांदूळ तसा फार दूर्मिळ नसला तरी फारशी लागवड होत नसलेला तांदूळ आहे.

टॅग्स :भातपीकपुणे