Join us

कुत्रा चावलाय? घाबरू नका, असे करा उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 11:49 AM

रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली त्या शास्त्रज्ञांची जयंती या दिनाचे उद्दिष्ट समाजात माणसांच्या आणि प्राण्यांवर रेबीजच्या प्रभावाविषयी जागरूकता वाढवणे हा आहे. या प्राणघातक आजाराबद्दल पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांच्याशी साधलेला संवाद.

रेबीज झाल्यावर त्यावर उपचार नसल्याने पेशंटचा शंभर टक्के मृत्यू ठरलेला. ग्रामीण भाषेत याला पिसाळलेला कुत्रा असेही म्हणतात. या प्राणघातक विषाणुजन्य रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २८ सप्टेंबर हा 'जागतिक रेबीज दिन' पाळण्यात येतो. हा दिवस म्हणजे लुई पाश्चर, ज्यांनी रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली त्या शास्त्रज्ञांची जयंती या दिनाचे उद्दिष्ट समाजात माणसांच्या आणि प्राण्यांवर रेबीजच्या प्रभावाविषयी जागरूकता वाढवणे हा आहे. या प्राणघातक आजाराबद्दल पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांच्याशी साधलेला संवाद.

'रेबीज'चा नेमका अर्थ काय?रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे. जर एखादा प्राणी रेबीजग्रस्त असेल, यामध्ये प्रामुख्याने कुत्री, माकड, वटवाघुळे व इतर प्राणी चावल्याने त्यांच्या लाळेतून दुसऱ्यांना पसरतो. रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यानंतर शून्य दिवस ते एक महिन्यापर्यंत त्याची प्रामुख्याने लक्षणे दिसतात; परंतु काही वेळा ही लक्षणे काही महिने ते १० किंवा २० वर्षांनंतरही दिसू शकतात. एकदा रेबीज झाला, तर त्या रुग्णाचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे प्राणी चावल्यावर लस घेणे हाच उपाय आहे.

प्रश्न यावर्षी पुणे शहरात कितीजणांना कुत्र्यांनी चावा घेतला, कितीजणांना लस दिली व रेबीजचे किती रुग्ण आढळले? शहरात गेल्यावर्षभरात २१ हजार जणांना, तर २०२२ मध्ये १६ हजार कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे; परंतु यावर्षी शहरातील एकाही रुग्णाला रेबीज झालेला नाही. २०२२ ते २३ मध्ये एकही मृत्यू नाही, ही चांगली बाब आहे. रेबीज झालेले पेशंट हे ग्रामीण भागातील आणि इतर जिल्ह्यांतून येतात. यावर्षी जूनअखेर १३ हजार २११ कुत्र्यांची नसबंदी आणि त्यानंतर त्याच कुत्र्यांना पुन्हा रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली आहे.

रेबीज झालेल्या रुग्णाची व कुत्र्याची काय लक्षणे असतात? सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे हा पेशंट पाण्याला घाबरतो. यालाच 'हायड्रोफोबिया' असेही म्हणतात. पाणी बघितले तरी चिडायला लागतो. तसेच पेशंट कुत्र्याप्रमाणे वागायला लागतो, तर कुत्र्यांमध्येही हीच लक्षणे असतात, ते पाण्याला घाबरतात. त्याच्या तोंडातून लाळ गळते. तो सैरावैरा पळत राहतो आणि दिसेल त्यावर हल्ला करतो.

याचा प्राण्यांमध्ये संसर्ग कसा होतो?हा विषाणूजन्य आजार आहे. हा व्हायरस असून, तो रेबीजग्रस्त प्राण्याच्या चाव्यातून किंवा त्याच्या लाळेशी संपर्क आल्याने पसरतो. हा विषाणू लाळेत असतो. हा प्राण्यांपासून प्राण्यांना किंवा प्राण्यांपासून माणसांना होतो. त्याचा हवेतून प्रसार होत नाही.

रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे प्रकार किती, त्या कुठे मिळतात, रेबीज प्रतिबंधक लस कधी घ्यावी?रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे दोन प्रकार आहेत. एक साध्या जखमेसाठी आणि दुसरी खोलवर झालेल्या जखमेसाठी. साध्या जखमेसाठी चावला त्या दिवशी, ३ न्या, ७व्या, १४ व्या व २१ व्या दिवसाला असे पाच डोस दंडात इंट्रामस्क्यूलर घ्यावे लागतात. पूर्वी यासाठी १४ इंजेक्शन बेंबीत घ्यावे लागत. जर जखम जास्त प्रमाणात खोल असेल तर त्या प्रमाणात जखम ग्रेड ए, बी, किंवा सी असते. त्यामध्ये त्याचे वर्गीकरण करून जखम सी गटातील असेल, तर 'इम्युनोग्लोबिलिन' लस जखमेत घ्यावी लागते. महापालिकेच्या सर्व हॉस्पिटलमध्ये लस मोफत उपलब्ध आहे. जे कुत्र्यांमध्ये काम करत असतात. त्यांना 'प्री बाईट'ही लस घेता येते.

कुत्रा चावल्यानंतर प्रथम काय करायला हवे ?चावलेल्या ठिकाणी दहा वेळा साबणाने धुऊन घ्या. जेणेकरून आतमध्ये कोणताच विषाणू जाऊच नये. हळद लावू नका. लगेच रुग्णालयात या आणि लस घ्या. पिसाळलेला कुत्रा चावला किंवा साधारण कुत्रा चावला तरी त्याकडे दुर्लक्ष न करता लस घ्यावी. कारण, कुत्रा साधा असला तरी तो रेबीजग्रस्त असू शकतो किंवा काही दिवसांनी त्याच्यामध्ये लक्षणे दिसू शकतात. म्हणून कोणताही धोका न पत्करता लस घ्यावी. लस शासकीय दवाखान्यांत मोफत उपलब्ध असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

रेबीजबाबत समाजात पुरेशी जागृती आहे का?शहरी भागात जागृती भरपूर आहे. लोक रेबीज प्राणघातक असल्याने लस घ्यायला येतात. तसेच आम्ही शहरात ठिकठिकाणी कुत्र्यांसाठी लसीकरण मोहीम घेतो. त्यामुळे नागरिकांमध्येही भीती कमी होत आहे. शहरातील जवळच्या गावातील लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा ग्रामीण भागात लोक लस घेत नाहीत. खूप जास्त लक्षणे दिसल्यावर मग नायडू हॉस्पिटल किंवा ससूनला येतात.

रेबीजचे उच्चाटन करण्यासाठी शासनाकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत.राष्ट्रीय रोग निवारण केंद्र म्हणजे 'एनसीडीसी ने पूर्ण भारत २०३० पर्यंत रेबीज फ्री करण्याचे टार्गेट दिले आहेत. त्यासाठी आपण मायक्रो प्लॅनिंग करत असून २०३० पर्यंत पुणे रेबीज फ्री करायचे आहे. त्यानुसार २०२१ पासून ठिकठिकाणी जाऊन कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे शंभर टक्के पूर्ण करायचे आहे.

टॅग्स :कुत्राआरोग्यनगर पालिकापुणे