Join us

शेतकरी पुत्रांचा नाद नाय करायचा; लग्नमंडपात बैलगाडीतून एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 1:10 PM

नवरदेव अक्षय व नवरी आकांक्षा या नवदाम्पत्याने बैलगाडीवर उभे राहून एंट्री

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. आजकाल लग्नात काहीतरी हटके आणि स्पेशल करण्याची क्रेझ आहे. रथ, घोडा, बुलेट किंवा हेलिकॉप्टरमधून नवरदेव, नवरी लग्नमंडपात एंट्री करतात. मात्र, आष्टी तालुक्यातील देवळाली येथील नवरदेव अक्षय व नवरी आकांक्षा या नवदाम्पत्याने सजवलेल्या बैलगाडीवर उभे राहून लग्नमंडपात एंट्री घेतली आहे.

सनईच्या सुरात नवरदेव अन् नवरी लग्नमंडपात आले. यावेळी नवरीच्या हातात बैलांची दोरी होती. नवरा-नवरीने एंट्री घेताच नातेवाईक आश्चर्याने बघत होते. नवरीने नऊवारी साडी आणि मराठमोळ्या पद्धतीचे दागिने परिधान केले होते. तर वरानेही महाराष्ट्रीय पद्धतीला साजेसा असा पोशाख परिधान केला होता.

बैलगाडी होतेय नामशेष; कारागीर झाले बेरोजगार 

बैलगाडीतून नवरदेव नवरीने एंट्री करत हे बळीराजाचे राज्य असल्याची प्रचिती उपस्थितांना दिली. ज्यामुळे शेतकर्‍यांच्या लेकरांचा हा प्रयोग अनेकांच्या पसंतीस आला. ग्रामीण भागात पूर्वी देखील या प्रमाणे बैल गाडीतून वरात काढली जायची तसेच वर्‍हाडी मंडळी देखील पूर्वी वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर करत.

अलीकडे घरोघरी चारचाकी वाहने आल्याने तसेच शेतीत देखील मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण वाढल्याने बैल गाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र नवतरुणांनी आपली संस्कृती इथली परंपरा जपली तर नक्कीच नामशेष होणार्‍या या सर्व गोष्टी येणार्‍या पिढीला देखील अनुभवता येईल.

 

टॅग्स :शेतकरीशेतीसांस्कृतिकलग्नबीडमराठवाडा