दिलीप कुंभारनरवाड : मिरज पूर्व भागातून द्राक्षाची पानगळ झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. बदलते हवामानामुळे द्राक्ष काड्यांची पानगळ सुरु झाली आहे. याचा उत्पादन वाढीवर परिणाम होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
अशी विदारक परिस्थिती असतानाही मिरज पूर्व भागातील जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या शेतात द्राक्षबागा फुलविल्या आहेत. मात्र, यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने द्राक्ष काड्यांची पानगळ मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
यामुळे द्राक्षबागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष काडीत असलेल्या द्राक्ष घडांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम ताकद देण्यासाठी औषधांचा वापर करावा लागणार आहे. मिरज पूर्व भागातून सध्या द्राक्ष फळ छाटणीची लगबग सुरू झाली आहे.
द्राक्ष काडीत एप्रिल ते मे महिन्यात गर्भधारणा प्रक्रिया पूर्ण झालेली असते. याच काळात जर हवामानात अचानक बदल झाला, तर याचा विपरीत परिणाम द्राक्ष घड निर्मितीवर होतो. हीच सुप्तावस्थेतील द्राक्षांची घडे ऑक्टोंबरच्या फळ छाटणीनंतर द्राक्ष काडीतून बाहेर पडतात.
एक द्राक्ष काडी तयार करण्यासाठी संबंधित काडीला १२ पाने ठेवून पहिल्या ५ किंवा ७ पानांवर शेंडा खुडून काडी सबकिन करावी लागते. सबकिन म्हणजे द्राक्ष काडीच्या खुडलेल्या ठिकाणापासून येणारा फुटवा होय.
ही काडी तपकिरी वाणाची म्हणजे ब्राऊन असावी लागते. यासाठी पावसाळ्यात काडी पांढरट वाणावर येताच काडीवर बोर्डोची फवारणी घ्यावी लागते. मात्र चालू वर्षी पाऊसमानातील वाढीमुळे शेतकऱ्यांना बौर्डच्या फवारण्या देता आल्या नाहीत.
परिणामी द्राक्ष छाटणीपुर्वीच काडीची पाने गळून पडली आहेत. यामुळे काडीतून गोळी घडांचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान द्राक्ष फळ छाटणीपर्यंत काडीवर पाने राहिल्यास द्राक्ष काडीतून टनक व दमदार घड बाहेर पडतात. यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे.
शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पावसामुळे नैसर्गिक पानगळ झाली आहे. याचा द्राक्ष काडीतील घड निर्मितीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती दिली. १० एप्रिलच्या अगोदर द्राक्षाची खरड छाटणी झालेल्या द्राक्ष बागांची पानगळ होणे स्वाभाविक आहे. मात्र, यानंतर झालेली पानगळ ही हवामानाच्या लहरीपणामुळे झाले आहे. - राजू रजपूत, कृषी सहायक