Join us

सोयाबीनवर फवारणीसाठी आता पैसे खर्च करू नका ; काय उपाय योजना कराव्यात वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 6:30 PM

शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीवर पैसा खर्च करू नये. आता काय करावे वाचा सविस्तर

वाशिम : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सोयाबीन या खरीप हंगामातील प्रमुख पिकावर बहुतांश ठिकाणी 'पिवळा मोझॅक' या विषाणूजन्य रोगाने हल्ला चढविला आहे. यासह मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकात पाणी साचून राहिल्याने मूळ सड रोगानेही डोके वर काढले आहे. त्यामुळे एकूण पेरणीच्या सुमारे २५ टक्के क्षेत्र बाधित झाले असून, उत्पन्नात विक्रमी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. 

त्यापैकी दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक अर्थात २ लाख ९७ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यंदा समाधानकारक पाऊस आणि अनुकूल वातावरणामुळे पिकाची वाढ जोमाने होण्यासह हिरवी उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी यासह अन्य प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव बहुतांशी नियंत्रणात राहिला आहे. 

यामुळे सोयाबीनपासून विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा पल्लवित झाली होती. अशात अधिकांश ठिकाणी सोयाबीनवर पिवळा मोझॅक या मुंगबिन विषाणूमुळे होणारा रोग पसरला. यामुळे झाडांची पाने पिवळी पडण्यासह फुले आणि शेंगा लागण्याच्या प्रमाणात घट झाली.

यासह मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकात पाणी साचून मूळ सड रोगाचाही प्रादुर्भाव वाढीस लागून सोयाबीन पुरते धोक्यात सापडल्याचे दिसून येत आहे. ही बाब नुकसानदायक ठरणारी असून सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात विक्रमी घट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, येत्या काहीच दिवसात सोयाबीनची सोंगणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिवळा मोझॅक किंवा मूळ सड रोगावर नियंत्रणासाठी खर्च करु नये, असा सल्ला देण्यात आला.

कशाने होतो मूळ सड रोग?

• चालूवर्षी मे ते जुलै या तीन महिन्यांत अधूनमधून अतिवृष्टी झाली. खोलगट भागातील सोयाबीनच्या पिकात अनेक दिवस पाणी साचून राहिल्याने मूळ सड रोगाचा प्रादुर्भाव झाला. 

• यामुळे पाने पिवळी पडून शेंगा आणि फुले लागण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचा थेट परिणाम झाला असून उत्पादनात घट होणे निश्चित मानले जात आहे.

काय आहे 'पिवळा मोझॅक'?

• 'पिवळा मोझॅक हा  मुंगबिन या विषाणूमुळे उद्भवणारा रोग असून पेरणीनंतर २५ व्या दिवशीच त्याची लक्षणे दिसायला लागतात.• २० दिवसाच्या खंडानंतर पाऊस होताच पीक पिवळे दिसायला लागते.• रोगग्रस्त झाडाच्या शेंगाची संख्या कमी होवून लहान आकाराचे दाने भरतात. यामुळे उत्पन्नात कमालीची घट येते.

उपाययोजनांची वेळ निघून गेली!

• यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी शास्त्रज्ञ भरत गिते यांच्याशी संवाद साधला असता, पिवळा मोझॅक आणि मूळ सड रोगाचा सोयाबीनवर अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे त्यांनी सांगितले.• मात्र, पीक आता सोंगणीला आल्याने उपाययोजनांची वेळ निघून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीवर पैसा खर्च करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

जिल्ह्यात सोयाबीनवर काही ठिकाणी पिवळा मोझॅक; तर काही ठिकाणी मूळ सड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, पीक आता सोंगणीच्या स्टेजवर आल्याने शेतकऱ्यांनी फवारणीच्या खर्चात न पडलेलेच बरे. - आरीफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कारंजा 

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनशेतकरीशेती